‘आरटीओं’च्या तिजोरीत ११० कोटींचा गल्ला
By admin | Published: April 8, 2017 12:06 AM2017-04-08T00:06:09+5:302017-04-08T00:06:09+5:30
पश्चिम महाराष्ट्रात सांगली जिल्हा अव्वल : इतिहासात पहिल्यांदाच सव्वाशे टक्के जास्त महसूल जमा
सांगली : महसूल जमा करण्यात सांगलीच्या आरटीओ कार्यालयाने पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. सुमारे ११० कोटी ३० लाख रुपयांचा ‘गल्ला’ महसुलाच्या माध्यमातून आरटीओंच्या तिजोरीत जमा झाला आहे. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल जमा झाला आहे, अशी माहिती आरटीओ दशरथ वाघुले यांनी दिली.
वाघुले म्हणाले, राज्य शासनाकडून दरवर्षी महसूल वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. २०१६-१७ या वर्षासाठी ९४ कोटी १० लाख रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. उद्दिष्टापेक्षाही सव्वाशे टक्के जास्त महसूल जमा झाला आहे. आरटीओ कार्यालयास रस्ता सुरक्षा निधी, दंड, एकरकमी कर, पर्यावरण कर, विविध स्वरुपाची फी या माध्यमातून महसूल जमा होतो. नवीन दुचाकी व चारचाकी वाहनांना अंकाच्या बेरीज-वजाबाकीचा हिशेब करुन आकर्षक क्रमांक घेण्याची ‘क्रेझ’ वाढली आहे. या माध्यमातून पाच हजार ३३७ वाहनधारकांनी आकर्षक क्रमांक घेतला. यातून चार कोटी ३६ लाखांचा कर मिळाला. मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन, तसेच विविध गुन्ह्यांत झालेल्या दंडात्मक कारवाईतून सात कोटी ६७ लाखांचा कर जमा झाला. अवैध प्रवासी वाहतुकीच्या ५७० केसीसमधून पावणेदोन लाखाचा दंड वसूल झाला. ‘ओव्हरलोड’ मालाची वाहतूक करताना ९८२ वाहने सापडली. त्यांच्याकडून एक कोटी ५७ लाखांचा दंड वसूल करण्यात यश आले. ही कारवाई आणखी तीव्र करण्यात आली आहे.
वाघुले म्हणाले, बेशिस्त रिक्षाचालकांविरुद्ध उघडण्यात आलेल्या कारवाईत ५१० रिक्षाचालक सापडले. त्यांच्याकडून ११ लाख ७० हजाराचा दंड वसूल केला. नियमांचे पालन न करता शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या १४३ वाहनाधारकांकडून चार लाख २१ हजाराचा दंड वसूल झाला. प्रवासी वाहतुकीचा परवाना नसताना खुलेआम प्रवासी वाहतूक करणारी ७४५ वाहने सापडली. या वाहनधारकांना १३ लाख ७४ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. रिफ्लेक्टर नसलेल्या ७६४ वाहनांवर कारवाई झाली. कर बुडविणाऱ्या वाहनधारकांची यादी बनवून कारवाई सुरु केली.
यावेळी निरीक्षक सचिन विधाते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जमा झालेला महसूल...
११ कोटी ९७ लाख रुपये विविध ‘फी’तून
६ कोटी ५७ लाख रुपये दंडातून
७५ कोटी रुपये एकरकमी करातून
६६ लाख रुपये रस्ता सुरक्षा निधीतून
१ कोटी ६५ लाख रुपय पर्यावरण करातून