पोलिसांकडून ११०० गणेश मंडळे दत्तक!

By Admin | Published: August 28, 2016 12:16 AM2016-08-28T00:16:50+5:302016-08-28T00:16:50+5:30

ठाणे ‘पॅटर्न’ सांगलीत : पोलिस उपअधीक्षकांचा पुढाकार; ३३० पोलिसांकडे पालकत्व

1100 Ganesh Mandals adopted by police! | पोलिसांकडून ११०० गणेश मंडळे दत्तक!

पोलिसांकडून ११०० गणेश मंडळे दत्तक!

googlenewsNext

सचिन लाड, सांगली : अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाची पोलिसांकडून जय्यत तयारी सुरू आहे. उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलिस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी उप विभागीय क्षेत्रातील ११०० गणेश मंडळे दत्तक घेतली आहेत. या मंडळांचे पालकत्व ३३० पोलिसांकडे सोपविले आहे. हे पोलिस प्रत्येक मंडळाच्या ‘श्रीं’च्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंतचा बंदोबस्त व सामाजिक एकोपा ठेवण्याची जबाबदारी पार पाडतील. बावचे यांनी ठाण्यात हा प्रयोग राबविला होता. तो यशस्वी झाल्याने येथे राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
सांगली शहर, ग्रामीण, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११०० सार्वजनिक गणेश मंडळांची संख्या ११०० आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस चौकी आहे. या चौकीत एक अधिकारी व सहा कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. गणेशोत्सवात बाहेरुन बंदोबस्त मागवूनही तो अपुरा पडतो. २४ तास बंदोबस्त करावा लागतो. हा ताण कमी व्हावा, धावपळ होऊ नये, यासाठी बावचे यांनी गणेश मंडळे दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येकी तीन पोलिसांकडे एक मंडळ दत्तक देण्यात आले आहे. एकूण ११०० मंडळे आहेत. प्रत्येक मंडळास तीनप्रमाणे ३३० पोलिसांकडे पालककत्व आले आहे. हे पोलिस मंडळांना परवाना मिळवून देणे, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, स्वयंसेवक यांची यादी तयार करुन त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक जवळ ठेवतील. तसेच त्यांचा स्वत:चा मोबाईल क्रमांकही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना देणार आहेत. गणेश मूर्तीच्या सुरक्षेसाठी रात्री कोण झोपणार आहे? याची माहिती ठेवणार आहेत. मंडळांना कोणतीही समस्या आली तर ती सोडविण्याची जबाबदारी याच पोलिसांवर सोपविली आहे.
गणेश मंडळांचे कार्यकर्ते रात्री वेळेवर ध्वनीक्षेपक बंद करतात का? देखावे पाहण्यास येणाऱ्या भाविकांशी सौजन्याचे वर्तन ठेवतात का? हे पाहण्याची जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे. पालकत्वाची भूमिका यशस्वी पार पाडली जात आहे का नाही, यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिस चौकीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. पाच, सात, नऊ आणि अकराव्यादिवशी गणेश मूर्तीचे विसर्जन होते. पाचव्या आणि सातव्यादिवशी बऱ्यापैकी विसर्जन होते. त्यामुळे पालकत्व घेतलेल्या पोलिसांची जबाबदारीतून सुटका होते. त्यांची पुढे नवव्या आणि अकराव्या दिवशीच्या मिरवणूक बंदोबस्तासाठी मदत होणार आहे. मंडळ दत्तक घेण्याचा हा उपक्रम पोलिसांवरील ताण कमी होण्याची निश्चितच उपयोगी ठरणार आहे.
पोलिसांना मिळणार बक्षीस!
गणेश मंडळांच्या पालकत्वाची जबाबदारी पार पाडून चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडणार आहे. तसेच त्यांचा बक्षीस देऊन गौरव केला जाणार आहे. यासंदर्भात उपअधीक्षक सुहास बावचे यांनी दोन दिवसांपूर्वी शहर, ग्रामीण, विश्रामबाग व संजयनगर पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दत्तक योजना कशी राबवायची, याबद्दल मार्गदर्शन केले. मिरवणूक वेळेत काढून ती वेळेत संपविणे ही मोठी जबाबदारी असून, पालकत्वाची भूमिका घेतलेले पोलिस ती यशस्वीपणे पार पाडू शकणार आहेत. कारण त्यांची मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत दररोज उठबस राहिल्याने चांगली ओळख झालेली असते.
सांगलीला बदली होण्यापूर्वी माझी ठाण्यात सेवा झाली आहे. तिथे मंडळांना दत्तक घेण्याचा उपक्रम राबविला होता. तोे चांगल्याप्रकारे यशस्वी झाला होता. याच धर्तीवर सांगलीतही तो राबविण्याचा निर्णय घेऊन अंमलबजावणी सुरु ठेवली आहे. यातून पोलिसांवरील ताण कमी होईल.
- सुहास बावचे, पोलिस उपअधीक्षक, सांगली शहर विभाग.
 

Web Title: 1100 Ganesh Mandals adopted by police!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.