जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

By admin | Published: July 22, 2016 12:07 AM2016-07-22T00:07:48+5:302016-07-22T00:08:02+5:30

संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे

11.22 percent salary increase in district bank | जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

जिल्हा बॅँकेत ११.२२ टक्के पगारवाढ

Next

सांगली : बारा वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर जिल्हा बॅँकेच्या कर्मचाऱ्यांना गुरुवारी ११.२२ टक्के पगारवाढीच्या संचालक मंडळाच्या निर्णयाने सुखद धक्का बसला. या पगारवाढीने वार्षिक पाच कोटी ४० लाख ९५ हजार २५६ रुपयांचा बोजा पडणार असून, व्यवस्थापन व स्टाफ खर्चाची कमाल मर्यादा न ओलांडता ही वाढ देण्यात आली आहे.
जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना सांगितले की, संचालक मंडळाच्या बैठकीत पगारवाढीचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. कर्मचारी संघटनांनी केलेल्या मागणीचा विचार करताना, आस्थापना व व्यवस्थापन खर्चाची नियमानुसार असलेली मर्यादा न ओलांडता ही पगारवाढ केली आहे. खेळत्या भांडवलाच्या दोन टक्क्यांपेक्षा जास्त मॅनेजमेंट कॉस्ट असू नये, असा नियम आहे. सध्याच्या पगारवाढीने मॅनेजमेंट कॉस्ट १.९० इतकी होणार आहे. स्टाफ कॉस्ट (कर्मचाऱ्यांवरील खर्च) दीड टक्क्यांपेक्षा जास्त करता येत नाही. सध्याच्या पगारवाढीनुसार हा खर्च १.२५ टक्के इतका झाला आहे. ही पगारवाढ १ एप्रिल २०१६ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. ३१ मार्च २०१९ पर्यंत पगारवाढीचा हा करार लागू आहे.
बॅँकेच्या वार्षिक उत्पन्नात पगारवाढीच्या रकमेपेक्षा जास्त वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सध्या बॅँकेची आर्थिक स्थिती भक्कम असून, राज्यातील सक्षम बॅँकांमध्ये या बॅँकेची गणना केली जात आहे. त्यामुळेच नियमांच्या अधीन राहून पगारवाढ केली आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून वर्षभरात चांगले काम झाले आहे. भविष्यातही तशीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले. यावेळी बॅँकेचे उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, प्रभारी कार्यकारी संचालक बी. एम. रामदुर्ग, व्यवस्थापक मानसिंग पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अशी झाली पगारवाढ
श्रेणी भरतीवेळी निवृत्तीवेळी
जुना पगार नवीन पगार जुना पगार नवीन पगार
प्रथम १८,४९८ २१,७८८ ५७,८६६ ६७,८६७
द्वितीय १६,५५३ १९,११९ ५३,६१८ ६१,८९२
तृतीय १४,५५४ १९,१९३ ५0,५४४ ५७,४७२
लिपिकवर्गीय१२,५५५ १४,१३0 ४७,९६६ ५३,९५0
शिपाई ११,0३४ १२,२८४ ३९,८0२ ४४,९२८
चालक११,१४२ १३,३९५ ३६,९0१ ४३,८८७

चौकट
कर्मचारी संघटनेकडून स्वागत
कर्मचारी संघटनेचे सचिव प्रदीप पाटील यांनी या निर्णयाचे स्वागत केले. बॅँक कर्मचारी संघटनेचे राज्याचे नेते खासदार आनंदराव आडसूळ यांनीही दूरध्वनीवरून अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांचे आभार मानले.


एक तप प्रतीक्षा
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा करार करण्यासाठी तब्बल १२ वर्षे प्रतीक्षा करावी लागली. दिलीपतात्या पाटील यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाने कर्मचाऱ्यांची ही प्रतीक्षा संपविल्याने कर्मचाऱ्यांमधून आनंद व्यक्त होत आहे.

सोनहिरा कारखान्याला सवलत
वेळेत कर्ज परतफेड केल्याबद्दल शासनाच्या योजनेनुसार सोनहिरा सहकारी साखर कारखान्यास व्याजात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. सवलतीची रक्कम २५ लाख ६८ हजार ६०० इतकी होते.
\

Web Title: 11.22 percent salary increase in district bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.