११४ अतिक्रमणे हटविली
By admin | Published: January 19, 2016 10:50 PM2016-01-19T22:50:46+5:302016-01-19T23:45:11+5:30
महापालिकेची विश्रामबागमध्ये कारवाई : जिमचे बांधकाम पाडले
सांगली : शहरातील शंभर फुटी रस्ता व विश्रामबाग गणपती मंदिर चौकातील ११४ अतिक्रमणांवर मंगळवारी महापालिकेने हातोडा टाकला. यावेळी जिमचे लोखंडी शेड, साहित्य, डिजिटल फलकांसह दूरध्वनीचे खांब काढण्यात आले.
महापालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार पुन्हा हाती घेतल्यानंतर अजिज कारचे यांनी अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच ठेवली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहीम उघडली होती. त्याचे नागरिकांतून स्वागत झाले होते. मंगळवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सहायक आयुक्त रमेश वाघमारे, शाखा अभियंता आप्पा हलकुडे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेच्या पथकाने अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली. पन्नासहून अधिक कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, वाहनांचा ताफा घेऊन पालिकेचे पथक रस्त्यावर उतरले होते.
सोमवारी महापालिकेच्या पथकाने विनापरवाना बांधकामांना टार्गेट केले होते. गणपती मंदिराजवळील बालाजी सिलेब्रेशन या इमारतीच्या टेरेसवरील जिमवर कारवाई केली होती. मंगळवारीही या जिमचे पत्रे व शेड हटविण्याचे काम सुरूच होते. जिममधील साहित्यही पथकाने ताब्यात घेतले आहे. गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरील मातीचा भराव, चढ-उतार जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आला. या रस्त्यावर मातीचा भराव असल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जात होती. हा भराव काढल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार आहे. या रस्त्यावर बंद असलेले दूरध्वनीचे खांबही काढून टाकण्यात आले. पथकाने शंभर फुटी रस्त्यावरील चेतना पेट्रोल पंप ते हॉटेल डायमंडपर्यंत झालेली अतिक्रमणे काढली. (प्रतिनिधी)
डिजिटल फलक जप्त
रस्त्यावरील सुमारे ३५ डिजिटल फलक जप्त केले आहेत. चार ठिकाणचे स्लॅब व कट्टे फोडण्यात आले.
रस्त्यावर मातीचा भराव असल्याने वाहने रस्त्यावरच पार्क केली जात होती. हा भराव काढल्याने रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी काही प्रमाणात कमी होणार.