येळदरीत घराला आग लागून ११.४५ लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:24 AM2021-03-21T04:24:43+5:302021-03-21T04:24:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जत : येळदरी (ता. जत) येथील सिद्रय्या आडव्याप्पा माने यांच्या घराला अचानक आग लागून सुमारे साडेअकरा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जत : येळदरी (ता. जत) येथील सिद्रय्या आडव्याप्पा माने यांच्या घराला अचानक आग लागून सुमारे साडेअकरा लाख रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तलाठी रवींद्र घाडगे, कोतवाल सुभाष कोळी यांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला असून, मदतीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
येळदरी गावालगत असलेल्या उत्तरे वस्ती येथे सिद्रय्या माने हे पत्नी, दोन मुले व मुलगी यांच्यासह राहतात. घरासमोर त्यांची द्राक्षाची बाग आहे. माने यांच्या वस्तीवर पत्राशेड व झोपडीवजा कुडाचे घर आहे. शुक्रवारी दुपारी माने हे जेवण करण्यासाठी घरी आले होते. जेवण झाल्यानंतर घरातील चुलीवर दूध तापविण्यासाठी ठेवून ते परत बागेत कामावर गेले. त्यानंतर वाऱ्याची झुळूक सुटून चुलीतील विस्तव उडून कुडाने पेट घेतला. यावेळी घराला लागून उभी असलेल्या मोटारसायकलला बागेसाठी आणलेले डिझेलचे कॅन अडकवले होते. कुडाला लागलेल्या आगीचा मोटारसायकलला स्पर्श झाला आणि काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि झोपडीने पेट घेतला.
आग लागल्याचे लक्षात येताच नागरिकांनी माने यांच्या तिन्ही मुलांना व घरातील गॅस सिलिंडर प्रथम बाहेर काढले. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली नाही. आगीत संसारोपयोगी साहित्य, दुचाकी, पाच पोती ज्वारी, द्राक्षबागेतील औषधे, दूरदर्शन संच, रोख चार लाख रुपये, तीस ग्रॅम सोने, एक शेळी, दोन कोकरू जळून खाक झाले. एकूण ११ लाख ४५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे माने कुटुंब उघड्यावर पडले असून, त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.