सांगली जिल्ह्यातील १,१५३ गुन्हेगार ‘रडार’वर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 11:50 PM2019-02-03T23:50:24+5:302019-02-03T23:50:32+5:30
सचिन लाड। लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच कारवाईची कडक ...
सचिन लाड।
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आतापासूनच कारवाईची कडक धडक मोहीम आखण्यास सुरुवात केली आहे.
निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी जिल्ह्यातील १ हजार १५३ गुन्हेगारांना कारवाईच्या ‘रडार’वर घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध ‘मोक्का’, ‘तडीपार’ व ‘झोपडपट्टीदादा’ कायद्यांतर्गत कारवाईचे नियोजन करण्यात आले आहे. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने व परमिट बिअर-बार यांनाही शांततेच्याद्दष्टीने ‘टार्गेट’ करण्यात आले आहे.
गतवर्षी सांगली महापालिकेची निवडणूक झाली. निवडणुकीसाठी लागू केलेल्या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिली होती. हॉटेल, ढाबे, दारूची दुकाने रात्री अकराला बंद करण्याचे आदेश दिले होते; पण या आदेशाला कोलदांडा दाखविण्यात आला. रात्री अकरानंतरही हॉटेल, दारूची दुकाने सुरू राहिली. यातून मिरज वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई समाधान मांटे यांचा विश्रामबाग येथे हॉटेल ‘रत्ना डिलक्स’मध्ये निर्घूण खून करण्यात आला.
या घटनेची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षकांसह दोन अधिकाऱ्यांना निलंबित केले होते. महापालिकेची निवडणूक शहरातपुरती मर्यादित होती. लोकसभा निवडणुकीचा माहोल संपूर्ण जिल्ह्यात राहणार आहे. महापालिका निवडणुकीत पोलिसाच्या झालेल्या खुनाचा अनुभव लक्षात घेऊन लोकसभा निवडणुकीत कोणाचीही गय न करण्याचा निर्णय पोलीस यंत्रणेने घेतला आहे.
खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गर्दी मारामारी, दहशत माजविणे, हत्यार बाळगणे, बेकायदा जमाव जमविणे असे दोनपेक्षा जादा गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी बनविण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख सुहेल शर्मा यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाºयांना दिले आहेत. गेल्या २० वर्षांत झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत त्रासदायक ठरलेल्या गुन्हेगारांची यादी बनविली जाणार आहे. स्वत: शर्मा यांनीच गुन्हेगारांची नावे सुचविली आहेत.
सांगली, मिरजेसह जिल्ह्यातील जवळपास १ हजार १५३ गुन्हेगारांना कारवाईच्या ‘रडार’वर घेतले आहेत. या सर्वांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे. काही गुन्हेगारांना निवडणूक काळापुरते पंधरा दिवसांसाठी जिल्ह्यातून तडीपार केले जाणार आहे.
सहा टोळ्यांना तडीपार, तर तीन टोळ्यांविरुद्ध महाराष्टÑ संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ‘अर्धा’ डझन गुन्हेगारांना झोपडपट्टीदादा कायद्यांतर्गत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध केले जाणार आहे.
दहा वाजता चिडीचूप होणार जिल्हा
निवडणुकीची आचारसंहिता लागताच पोलिसांचे काम खºयाअर्थाने सुरु राहणार आहे. यासाठी हॉटेल्स, ढाबे, दारूची दुकाने, परमिट रुम, बिअर बार, पान दुकाने व खाद्यपदार्थ विक्रीचे गाडे रात्री दहा वाजता बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दहानंतर शहरासह तालुकेही चिडीचूप होणार आहेत. ढाब्यावर दारु सापडली तर केवळ ती जप्त करण्याची कारवाई करु नये. मालकाने दारु कोठून आणली, याचा शोध घेऊन संबंधितावर कारवाईचे आदेश दिले आहेत. खबºयांचे ‘नेटवर्क’ सक्रिय करण्याची सूचनाही शर्मा यांनी केली आहे. पोलीस मित्रांचीही मदत घेतली जाणार आहे.