सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:09 PM2022-09-20T12:09:35+5:302022-09-20T12:10:00+5:30

वाढलेल्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि ऐतवडे खुर्दला भेट देऊन पाहणी केली.

118 animals infected with lumpy in Sangli district, three cows died | सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा

सांगली जिल्ह्यात ११८ जनावरे लम्पी बाधित, तीन गायींचा मृत्यू; पशुसंवर्धन आयुक्तांनी घेतला आढावा

Next

सांगली : जिल्ह्यात लम्पी बाधित जनावरांची संख्या ११८ झाली आहे. यामध्ये सोमवारी नव्याने नऊ जनावरांना लम्पी त्वचारोगाची लागण झाली असून, त्यांच्यावर पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. आतापर्यंत लम्पी बाधित तीन गायींचा मृत्यू झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात वाढलेल्या लम्पी त्वचारोगाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी वाळवा तालुक्यातील शेखरवाडी आणि ऐतवडे खुर्दला भेट देऊन पाहणी केली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात लम्पी स्किनचा प्रार्दुभाव आढळून येत आहे. दिवसेंदिवस लम्पीचा फैलाव वाढत चालला असल्याचे सोमवारीही स्पष्ट झाले. त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सोमवारी पुन्हा नव्याने ९ बाधित जनावरे आढळली. जिल्ह्यात आत्तापर्यंत ११८ जनावरांना लम्पी स्किनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यापैकी ४५ जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत, मात्र त्यांच्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांचे लक्ष आहे. सर्व बाधित जनावरांवर पशुसंवर्धन विभागामार्फत उपचार सुरू आहेत. लम्पी बाधित जनावरांपैकी तीन जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वाळवा तालुक्यात लम्पीचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी शेखरवाडी आणि ऐतवडे खुर्दला भेट देऊन तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. लम्पी आजार तसेच लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. यावेळी उपचाराबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. जनावरांच्या उपचारात हलगर्जीपणा करू नये, गरजेनुसार खासगी पशुधन विकास अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी तसेच लसीकरणात हलगर्जीपणा करू नये, अशा सूचना जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना सिंह यांनी दिल्या.

जिल्ह्यात ४८ हजार जनावरांचे लसीकरण

जिल्ह्यात गायी, म्हशींसह मोठ्या जनावरांची संख्या आठ लाख ३४ हजार १८० आहे. यापैकी सध्या गायींमध्येच लम्पी आजाराचा सर्वाधिक फैलाव आहे. यामुळे गायींचे लसीकरण करण्याला पशुसंवर्धन विभागाने प्राधान्य दिले आहे. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ४८ हजार पशुधनाचे लसीकरण झाले असून, एक लाख ४० हजार लस शासनाकडून मिळाली आहे.

उपचारात हलगर्जीपणा नको : सच्चिद्रप्रताप सिंह

लम्पीचा फैलाव रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना कराव्यात. उपचारात हलगर्जीपणा करू नये. खासगी पशुधन विकास अधिकाऱ्यांची मदत घेण्यात यावी, अशा सूचना पशुसंवर्धन आयुक्त सच्चिद्रप्रताप सिंह यांनी दिल्या. लसीकरणापासून जनावरे वंचित राहणार नाहीत, याबाबतची दक्षता जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: 118 animals infected with lumpy in Sangli district, three cows died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली