नरेंद्र दाभोलकरांची १२ पुस्तके आता ब्रेल लिपीत
By संतोष भिसे | Published: February 15, 2024 03:47 PM2024-02-15T15:47:39+5:302024-02-15T15:47:58+5:30
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध करण्यात आले आहे. ब्रेलमधील १२ पुस्तकांचे ...
सांगली : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य ब्रेल लिपीत उपलब्ध करण्यात आले आहे. ब्रेलमधील १२ पुस्तकांचे प्रकाशन डॉ. हमीद दाभोलकर यांच्या हस्ते आळंदी येथे अंधशाळेत होणार आहे. यावेळी लायन मीनांजली मोहिते उपस्थित राहणार आहेत. दृष्टीहिनांच्या १० संस्थांना १२ पुस्तकांचा संच यावेळी सुपूर्त करण्यात येईल.
अंनिस व दाभोलकर यांचे विवेकी विचार दृष्टिहिन व्यक्तींपर्यंत पोहोचावेत आणि त्यांनी आत्मविश्वासाने आयुष्य जगावे या उद्देशाने लायन उषा येवले यांनी दाभोलकरांची पुस्तके ब्रेलमध्ये उपलब्ध केली आहेत. यामुळे दृष्टिहिनांपर्यंत अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकवाद, चमत्कार सादरीकरण, स्रिया आणि अंधश्रद्धा, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा, फलज्योतिष, श्रध्दा अंधश्रद्धा, उत्क्रांतीवाद, धर्मनिरपेक्षता असे विषय पोहोचणार आहेत.
डॉ. दाभोलकर यांचे सर्व साहित्य यापूर्वी हिंदीमध्ये प्रसिद्ध झाले आहे. ब्रेमधील उपलब्धता म्हणजे दृष्टिहिनांना डोळस बनविणारा उपक्रम आहे. वैचारिक, विज्ञानवादी, पुरोगामी साहित्य ब्रेलमध्ये उपलब्ध नसते. ही उणीव लक्षात घेऊन अंनिसच्या हितचिंतक लायन उषा येवले आणि त्यांचे पती अशोक येवले (निगडी, पुणे) यांच्या आर्थिक सहकार्यातून ही उपलब्धी झाली. जागृती अंधशाळेच्या ब्रेल छापखान्याचे गजानन मगर, अंनिसचे राहुल थोरात, मिलिंद देशमुख, जागृती अंधशाळेच्या मुख्याध्यापिका मंगला वानखेडे, सिध्दू बिराजदार यांच्या सहकार्याने ही पुरोगामी विचारांची पुस्तके ब्रेल लिपीत येत आहेत.