सहकारी बोर्डावर १२ संचालक बिनविरोध
By Admin | Published: January 12, 2016 12:13 AM2016-01-12T00:13:17+5:302016-01-12T00:43:12+5:30
पंचवार्षिक निवडणूक : उर्वरित जागाही बिनविरोधच्या हालचाली
सांगली : सांगली जिल्हा सहकारी बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकूण १९ पैकी १२ जागांवर संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उर्वरित सात जागांसाठी अजून अनेकांचे अर्ज असल्याने त्याठिकाणीही बिनविरोधसाठी हालचाली सुरू आहेत, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये सहकारी शिक्षण, प्रशिक्षणाचे गेल्या ७० वर्षांपासून काम करणाऱ्या या बोर्डातील जागा बिनविरोध होत आहेत. जिल्ह्यातील ५ हजार सहकारी संस्थांच्या पदाधिकारी, संचालक व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे काम ही संस्था करते. महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, विभागीय मंडळ या त्रिस्तरीय संस्थांमध्ये जिल्हा सहकारी बोर्ड या संस्थेचा समावेश असल्याने या प्रशिक्षणाला कायदेशीर अर्थ प्राप्त होतो.
या महत्त्वाच्या संचालक मंडळाच्या १९ जागांकरिता निवडणूक लागली होती. त्यापैकी बारा जागांवर संचालक बिनविरोध झाले आहेत. उर्वरित सात जागांसाठी एकापेक्षा अनेक अर्ज शिल्लक आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत १८ जानेवारी असल्याने तोपर्यंत यासुद्धा जागा बिनविरोध करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या प्रयत्नांना निश्चित यश मिळेल, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली. सहकार बोर्डाच्या निवडणुकीसाठी साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)
बिनविरोध संचालक
कवठेमहांकाळ - बाळासाहेब पांडुरंग गुरव, कडेगाव - छगन गोविंद कदम, खानापूर - भास्कर निवृत्ती पवार, जत - विजय निगोंडा पाटील, तासगाव - शंकरराव आत्माराम पाटील, वाळवा - दिलीप पतंगराव पाटील, शिराळा सुखदेव श्रीपती पाटील, संस्था (जिल्हा कार्यक्षेत्र) - डॉ. प्रताप बाजीराव पाटील, व्यक्तीगत सभासद - विजय श्रीकांत चिप्पलकट्टी, राजीव आण्णासाहेब लाले, अनुसूचित जाती/जमाती - रघुनाथ जगन्नाथ वायदंडे, विमुक्त व भटक्या जमाती - सदाशिव गणपती दार्इंगडे.