सांगलीत पावणे दोन लाखाचा बारा किलो गांजा जप्त, एलसीबी, शहर पोलिसांची कारवाई
By शीतल पाटील | Published: January 19, 2023 08:06 PM2023-01-19T20:06:52+5:302023-01-19T20:07:00+5:30
शहरातील शामरावनगर परिसरातील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली.
सांगली :
शहरातील शामरावनगर परिसरातील झुलेलाल मंदिर चौक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि सांगली शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली. या दोघांकडून १ लाख ८० हजार रुपयांचा बारा किलो गांजा जप्त केला. त्यांना गांजा पुरविणाऱ्या सांगोला येथील साथीदारालाही अटक करण्यात आली. संशयितांपैकी एक हद्दपारीतील गुन्हेगार आहे.
धनंजय शैलेश भोसले (वय ३५ रा. दत्त कॉलनी, शामरावनगर), तुषार महेश भिसे (१९ रा. हरिपूर रोड, काळीवाट) आणि गणेश भाऊ साळुंखे (वय २६ रा. कोळे, ता. सांगोला ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगली-कोल्हापूर रस्त्यावरील झुलेलाल मंदिर चौक पसिरात दोघे जण बुधवार, दि.१८ रोजी गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एलसीबीचे विक्रम खोत व संतोष गळवे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि सांगली शहर पोलिस ठाणे पथकाने परिसरात सापळा लावला. काही वेळात तेथे धनंजय भोसले व तुषार भिसे हे थांबल्याचे पोलिसांना दिसले. त्यातील भोसले याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली आहे. संशयितांनी पोलिसांना पाहताच पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले.
दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीत गांजा असल्याचे आढळले. भोसले आणि भिसे या दोघांकडून १ लाख ८० हजार रुपयांचा गांजा हस्तगत केला. त्यांच्याकडून तीन मोबाईल पोलिसांनी जप्त केले. सांगोला येथील साथीदार गणेश भाऊ साळुंखे याच्याकडून गांजा घेतल्याचे दोघांनी सांगितले. सध्या साळुंखे हा तासगाव रोडवरील कुमठे फाटा येथे थांबल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने कुमठे फाटा येथे जावून साळुंखे यालाही ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत संशयित भोसले हद्दीपारीची नोटीस असतानाही विनापरवाना शहरात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले. तिघांवर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक सतीश शिंदे, पोलिस निरीक्षक अभिजित देशमुख, सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार, धनाजी पाटील, उपनिरीक्षक विजय सुतार, सागर लवटे, संतोष गळवे, दिलीप जाधव, विनायक शिंदे, झाकीर काझी, अरिफ मुजावर यांनी भाग घेतला.