Sangli: इस्लामपुरात सोन्याच्या बिस्किटाच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक, दुप्पट लाभ देण्याची बतावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 04:16 PM2023-07-26T16:16:18+5:302023-07-26T16:16:37+5:30
‘मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगत शिवीगाळही केली
इस्लामपूर : शहरातील किसाननगर परिसरात राहणाऱ्या महिलेस सोन्याच्या बिस्किटाचे आमिष दाखवत दीड महिन्यात दुप्पट लाभ मिळवून देण्याची बतावणी करत कल्याण-ठाणे येथील भामट्याने १२ लाख रुपयांचा गंडा घातला. ही घटना मागील वर्षीच्या जून, जुलै महिन्यात घडली असून, सातत्याने मागणी करूनही पैसे न मिळाल्याने पोलिसांत आता फिर्याद दाखल झाली आहे.
याबाबत संगीता नीलेश पाटील (३९, किसाननगर, इस्लामपूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश उत्तम साबळे (आंबिवली, कल्याण-वेस्ट, ठाणे) या भामट्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संगीता पाटील या गेल्या चार वर्षांपासून नेटवर्किंग मार्केटिंगचा व्यवसाय करतात. यातून राजेश साबळे हा त्यांच्या संपर्कात आला होता.
मी कस्टम कार्यालयातून सोन्याची बिस्किटे घेऊन त्यावर जादा २० टक्के नफा मिळवत ती सराफ व्यापाऱ्यांना विकत असतो. महिन्यातून ४ ते ५ वेळा सोन्याच्या बिस्किटांची विक्री करतो. मुंबईतील बऱ्याच लोकांना दामदुप्पट पैसे मिळवून दिले आहेत, अशी बतावणी करत साबळे याने पाटील यांचा विश्वास संपादन केला. फायदा मिळालेल्या लोकांच्या व्हिडीओ क्लिपही दाखवल्या.
संगीता पाटील यांचा साबळे याच्या बोलण्यावर विश्वास बसल्याने त्यांनी गेल्या वर्षीच्या जून आणि जुलैमध्ये स्वत:जवळील आणि नातेवाईक, मित्रांकडून १२ लाख रुपये उसनवारीने जमा करून ते रोख आणि आरटीजीएसद्वारे साबळे याच्याकडे दिले. त्यानंतर दीड महिन्याने त्यांनी साबळे याच्याशी संपर्क केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. फोन घ्यायचे टाळू लागला. मात्र, तरीही पाटील यांनी पैशासाठीचा तगादा सोडला नव्हता.
८ जून २०२३ ला साबळे याच्याशी संपर्क झाल्यावर ‘मी तुला पैसे देणार नाही, तुला काय करायचे ते कर’ असे सांगत साबळेने शिवीगाळही केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करत आहेत.