खुनाची सुपारी घेतल्याचे सांगत १२ लाख उकळले; सांगलीतील एक जण ताब्यात
By घनशाम नवाथे | Published: June 9, 2024 10:44 PM2024-06-09T22:44:01+5:302024-06-09T22:44:17+5:30
चौघांनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवला
सांगली : पुण्यातील पार्टीने खुनाची सुपारी घेतल्याचे सांगून प्लॉटिंगचा व्यवसाय करणाऱ्यास रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून १२ लाखांची खंडणी उकळल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी अक्तरमिया नालसो शेख (वय ४९, रा. खोजा कॉलनी, सह्याद्रीनगर, सांगली) यांनी संजयनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी संशयित यासीन खलील इनामदार (रा. हडको कॉलनी, सांगली) आणि अनोळखी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. इनामदार याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित यासीन इनामदार याने फिर्यादी अक्तरमिया शेख यांची ओळख आहे. शेख यांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे. इनामदार याने शेख यांना दि. १० मेरोजी भेटून त्यांना तुला ठार मारण्याची सुपारी पुण्यातील एका पार्टीकडे देण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे शेख घाबरले. यावेळी संशयित इनामदारने त्याच्या मोबाइलमध्ये आलेला फोटोदेखील शेख यांना दाखविला. ज्यांनी सुपारी घेतली आहे त्या पुण्यातील पार्टीशी ओळख असल्याचे सांगितले. तेव्हा घाबरलेल्या शेख यांनी त्यांना भेटून विनंती करू या, असे सांगितले.
संशयित इनामदार याने कऱ्हाड येथे चौघांची भेट घडवून आणली. तेव्हा सुपारी घेतलेल्या चौघांनी फिर्यादी शेख यांच्याकडे ६० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर दि. १७ मेरोजी फिर्यादी शेख यांना जिवे मारण्याची धमकी देऊन पाच जणांनी तुरची फाटा येथे त्यांच्याकडून १२ लाख रुपयांची खंडणी उकळली. शेख यांनी या प्रकारानंतर सुमारे वीस दिवसांनी संजयनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदविली. पोलिसांनी इनामदार आणि संशयित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. इनामदार याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. संशयित चौघांचा शोध सुरू आहे. चौघांच्या अटकेनंतर या प्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिस निरीक्षक बयाजी कुरळे यांनी सांगितले.