खते, बियाणे, कीटकनाशकांचे १२० नमुने अप्रमाणित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:50 AM2021-02-21T04:50:10+5:302021-02-21T04:50:10+5:30
गुणनियंत्रक ११ पथकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बियाण्यांचे ६६८, खतांचे ६४२ आणि कीटकनाशकांचे ३९८ नमुने घेऊन ते पुणे येथील ...
गुणनियंत्रक ११ पथकांसह कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत बियाण्यांचे ६६८, खतांचे ६४२ आणि कीटकनाशकांचे ३९८ नमुने घेऊन ते पुणे येथील प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. या नमुन्यांचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आले आहेत. यामध्ये सोयाबीनसह अन्य बियाण्यांचे ४० नमुने अप्रमाणित आले आहेत. सोयाबीनची उगवण क्षमता किमान ७० टक्क्यांपेक्षा जास्त असणे अपेक्षित होते; परंतु तपासणीमध्ये ४० ते ३५ टक्क्यांपर्यंत उगवण क्षमता आढळून आली आहे. यामध्ये शासनाचे नियंत्रण असलेल्या महाबीज कंपनीचाही समावेश आहे. ३५ कोर्ट केस पात्र आणि पाच अपात्र नमुन्यांप्रकरणी कंपन्यांना समज देण्यात आली आहे. तसेच २७ नुमन्यांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्यामुळे त्यांच्यावर न्यायालयात गुन्हे दाखल केले आहेत.
रासायनिक खताच्या ६४२ नमुन्यांपैकी ६६ नुमन्यांमध्ये गंभीर त्रुटी असल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात येणार आहेत. ११ नुमन्यांमध्ये किरकोळ अप्रमाणित आल्यामुळे त्यांना समज दिली आहे. तसेच अप्रमाणित खताचा वापर न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कीटकनाशकांचे ३३१ नुमने काढले होते. त्यापैकी तीन नमुने अप्रमाणित आले असून त्यांच्यावर न्यायालयात दावे दाखल केले जाणार आहेत.
चौकट
दोषी कंपन्यांवर कारवाई : सुरेंद्र पाटील
खते, बियाणे आणि कीटकनाशकांचे जे नमुने अप्रमाणित आले आहेत, त्या कंपन्यांना विक्री बंदचे आदेश दिले आहेत. काही ठिकाणी सोयाबीनच्या बियाण्यांचा वापर झालेला होता. त्याची उगवण चांगली झाली नाही, त्या शेतकऱ्यांना संबंधित कंपन्यांनी बियाणे बदलून दिले आहेत. ज्या कंपन्यांचे खते, बियाणे आणि कीटकनाशके अप्रमाणित आले आहे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे, अशी माहिती जिल्हा गुणनियंत्रक निरीक्षक सुरेंद्र पाटील यांनी दिली.