इस्लामपूरसाठी १२३ कोटींची पाणी योजना मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 05:19 PM2023-06-22T17:19:39+5:302023-06-22T17:20:14+5:30
भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली माहिती
इस्लामपूर : इस्लामपूर शहरासाठी केंद्र शासनाच्या अमृत-२ अभियानातून १२३ कोटी रुपये खर्चाच्या २४ तास पिण्याचे पाणी देणाऱ्या योजनेस महाराष्ट्र शासनाने तांत्रिक मंजुरी दिल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली.
माजी नगराध्यक्ष व भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील म्हणाले, आगामी ३० वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून ही अत्याधुनिक स्काडा पद्धतीने संगणकीय प्रणालीवर चालणारी योजना आहे. दररोज दोन कोटी ७० लाख ५० हजार लिटर पाण्याचे वितरण करणार आहे. पूर्णपणे सौरऊर्जेवर सुरू राहणार आहे. १८० किलोमीटरची एचडीपी पाइपलाइन व सात नव्या टाक्या उभारल्या जाणार आहेत. प्रत्येक कुटुंबाला अल्ट्रासॉनिक मीटर मोफत दिले जाणार आहे.
ते म्हणाले, १२३ कोटी रुपयांचा निधी मिळणारी ‘ब ’वर्गातील राज्यातील ही एकमेव पालिका आहे. सर्व भागांत समान दाबाने प्रतिमाणसी १३५ लिटर पाणी मिळणार आहे. २०५५ पर्यंतचा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, शिवसेनेचे आनंदराव पवार, विक्रम पाटील, राहुल महाडिक, वैभव पवार यांचेही योगदान या योजनेसाठी मिळाले आहे.
विक्रम पाटील म्हणाले, ३० वर्षांच्या सत्ताकाळात राष्ट्रवादीने भुयारी गटार, २४ बाय ७ पाणी योजनेचे गाजर दाखवत निवडणुका लढवल्या. १९९५ साली राज्यातील युती शासनाने नवीन पाणी योजनेसाठी मंजुरी देण्याची तयारी दाखवली होती. मात्र युतीला श्रेय मिळेल म्हणून राष्ट्रवादीने विरोध केला.
ते म्हणाले, गेल्या पालिका निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता ताब्यात द्या, शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असा शब्द दिला होता. नव्या पाणी योजनेसाठी १२३ कोटींचा निधी देत त्यांनी शब्द खरा केला आहे.
विकास आघाडीने दिलेला शब्द पाळला
विक्रम पाटील म्हणाले, विकास आघाडीने दिलेला प्रत्येक शब्द पाळून विकासकामे केल्याने शहरातील जनता आमच्या पाठीशी उभा राहिली.
भाजपमधील गटबाजी कायम
पाणी योजनेसाठी निधी मंजूर झाल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून दोन वेगवेगळ्या पत्रकार परिषदांमधून देण्यात आली. त्यातून पक्षातील गटबाजी कायम असल्याचे स्पष्ट झाले.