‘चांदोली’त १२.३६ टीएमसी पाणीसाठा
By Admin | Published: April 25, 2016 11:30 PM2016-04-25T23:30:07+5:302016-04-26T00:47:57+5:30
वीज निर्मिती बंद : वारणा नदीत १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग
वारणावती : चांदोली धरणामध्ये १२.३६ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून, कर्नाटकला एक टीएमसी पाणी द्यायचे असल्याने धरणातून १८२० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदीत सुरू आहे. पाणीसाठा कमी झाल्याने वीज निर्मिती रविवारी सायंकाळी पाचपासून बंद करण्यात आली आहे. धरणामध्ये शिल्लक असणारे पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज धरण प्रशासनाने व्यक्त केला आहे.
शिराळा तालुक्याच्या पश्चिम टोकावर असणारे चांदोली धरण, दुष्काळी भीषण परिस्थितीत वरदान ठरत आहे. पावसाळ्यात या धरणात ३४ टीएमसी पाणीसाठा झाला होता. सिंचनासाठी पाण्याचा वापर कालव्यातून व वारणा नदीतून केला जातो. आजपर्यंत २२ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे, तर १२.३६ टीएमसी पाणीसाठा सध्या शिल्लक आहे. येत्या चार-पाच दिवसात कर्नाटकला लागणारे एक टीएमसी पाणी देण्याचे नियोजन पूर्ण होईल. त्यानंतर सुमारे १२०० ते १३०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू राहील. एवढ्या विसर्गाने पाणी सोडले तरीही, धरणातील पाणी जूनपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे. धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५.४५ टीएमसी आहे. त्यामुळे सुमारे सात टीएमसी पाणी वापरता येणार आहे. धरणाची पाणी पातळी ५९९.४५ मीटर असून ३४९.१७० दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. त्याची टक्केवारी ३४.८४ टक्के आहे.
धरणाच्या पाण्यावर वीजनिर्मिती करणारी १६ मेगावॅट वीज निर्मितीची दोन जनित्रे आहेत. धरणातील पाणी पातळी कमी झाल्याने ही दोन्ही जनित्रे रविवारी सायंकाळपासून बंद केली आहेत. मुख्य कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी बंद करून धरणातून १८२० क्युसेक्सचा निसर्ग वारणा नदीत सोडला. कर्नाटकसह दुष्काळी भागाला चांदोली धरण वरदान ठरत आहे. (वार्ताहर)