विटा नगर परिषदेच्या १२५ कोटींच्या अर्थसंकल्पास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:27+5:302021-02-27T04:35:27+5:30
विटा : चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या शुक्रवारी सभागृहात ...
विटा : चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ न करता नागरिकांना दिलासा देत सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाच्या शुक्रवारी सभागृहात मांडलेल्या १२५ कोटी ५० लाख ३८ हजार ९४४ रुपयांच्या अर्थसंकल्पास मंजुरी देण्यात आली.
या वर्षी विकासकामे आणि मॉडेल (डिजिटल) स्कूलसाठी भरीव तरतूद करण्यात आली असून श्री रेवणसिद्ध मूळस्थान गुंफा येेथील विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी ई-रिक्षाने वाहतूक करण्याचे प्रस्तावित केले आहे.
विटा नगर परिषदेच्या सन २०२०-२१ चा दुरुस्ती आणि सन २०२१-२२ चा सुधारित अर्थसंकल्प शुक्रवारी विटा नगर परिषदेच्या लोकनेते हणमंतराव पाटील सभागृहात मांडण्यात आला. नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपनगराध्यक्षा सारिका सपकाळ, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या अर्थसंकल्पास सर्वानुमते मंजुरी देण्यात आली.
विटा नगर परिषदेची सन २०२०-२१ ची आरंभीची शिल्लक ५२ कोटी ४५ लाख ९२ हजार ९५७ व विविध निधी आणि करांपासून मिळालेले ५६ कोटी ७८ लाख ९९ हजार २०० रुपयांची रक्कम एकत्रित करून १०९ कोटी २४ लाख ९२ हजार १५७ रुपये जमा धरण्यात आली आहे. त्यापैकी सन २०२०-२१ चा ६९ कोटी ७० लाख १७ हजार ७१३ रुपये खर्च वजा जाता ३९ कोटी ५४ लाख ७४ हजार ४४४ रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे.
या वर्षीची शिल्लक सन २०२१-२२ च्या अनुमानित अर्थसंकल्पात घेण्यात आली आहे. या वर्षीची विविध करांपासून मिळणारी ८५ कोटी ९५ लाख ६४ हजार ५०० रुपये अशी एकूण शिलकेसह १२५ कोटी ५० लाख ३८ हजार ९४४ रुपयांचा अर्थसंकल्प सभेत मांडण्यात आला होता. त्यापैकी विविध विकासकामे व अन्य कारणांसाठी १२५ कोटी ४७ लाख ४८ हजार ९७७ रुपये खर्च वजा जाता २ लाख ८९ हजार ९६७ चे शिलकी अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे.
विटा शहरातील नागरिकांवर या वर्षी कोणतीही करवाढ लादण्यात आली नाही. नवीन रस्ते व दुरुस्तीसाठी सव्वापाच कोटी, भुयारी गटार योजनेसाठी ६ कोटी, पाणीपुरवठा योजनेसाठी ७ कोटी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. यासह विविध विकासकामांसाठीही या अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद केली आहे.