सांगलीत आंतरराज्य चोरट्यांकडून १३ दुचाकी जप्त, दोघांना अटक
By घनशाम नवाथे | Published: April 27, 2024 02:19 PM2024-04-27T14:19:38+5:302024-04-27T14:20:39+5:30
एकजण रेकॉर्डवरील आरोपी
सांगली : राष्ट्रीय महामार्गावरील तानंग फाटा पुलाखाली चोरीची दुचाकी विक्रीसाठी आलेल्या रणजीत श्रीरंग लोखंडे (वय २५, सध्या रा. अहिल्यानगर, मुळ रा. मल्हारवाडी, मंगसुळी, ता. अथणी) व अशोक विश्वनाथ काशिद (वय २६, सध्या रा. प्रकाशनगर, मूळ रा. मांजरी, ता. चिक्कोडी) या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने अटक केली. दोघांकडून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या आहेत.
अधिक माहिती अशी, गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सहायक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केले आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना तानंग फाटा येथे पुलाखाली दोघे संशयित विना नंबरप्लेटची दुचाकी घेऊन आले असून दुचाकी विक्री करणार आहेत अशी माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तेथे धाव घेतली. दोघांना पळून जाण्याची संधी न देता पकडले.
दोघांची चौकशी केल्यानंतर त्यांनी काही दुचाकी चोरल्याची कबुली देत त्यापैकीच ही एक असल्याचे सांगितले. चोरीच्या दुचाकी अहिल्यानगर येथे राहत असलेल्या घराजवळ मोकळ्या जागेत लावल्याचे सांगितले. तेव्हा पथकाने दोघांना घेऊन जाऊन अहिल्यानगर येथून चोरीच्या १३ दुचाकी जप्त केल्या. त्याची किंमत सुमारे साडे सहा लाख रूपये इतकी आहे. दोघांना तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्याकडे वर्ग केले आहे.
सहायक निरीक्षक पवार, सहायक फौजदार अनिल ऐनापुरे, कर्मचारी सचिन धोत्रे, इम्रान मुल्ला, अरूण पाटील, अमोल ऐदाळे, कुबेर खोत, प्रकाश पाटील, अनंत कुडाळकर, सूरज थोरात, सुनिल जाधव, विनायक सुतार, अभिजीत ठाणेकर, रोहन घस्ते, श्रीधर बागडी, कॅप्टन गुंडवाडे, विवेक साळुंखे, अजय पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.
एकजण रेकॉर्डवरील आरोपी
दोघा चोरट्यांनी मिरज ग्रामीण, तासगाव, कुपवाड, कवठेमहांकाळ, सांगली शहर, कागवाड, कुडची येथे दुचाकी चोरल्या आहेत. रणजीत लोखंडे हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. त्याच्याविरूद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत.