पद्माळेत मगरीची १३ पिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2015 12:43 AM2015-06-28T00:43:56+5:302015-06-28T00:44:13+5:30
वनविभागाची पाठ : शेतकऱ्याने नदीत सोडली; कृष्णा काठ भीतीच्या छायेत
सांगली : कृष्णा नदीच्या काठावर मगरींकडून सातत्याने हल्ले होत असताना शुक्रवारी दुपारी सांगलीजवळच्या पद्माळे (ता. मिरज) येथील बजरंग पाटील यांच्या शेतात मगरीची १३ पिल्ली आढळून आली. पाटील यांनी वनविभागास याची माहिती देऊनही एकही कर्मचारी फिरकला नाही. शेवटी पाटील यांनी सर्व पिल्ली नदीत सोडून दिली.
सांगली ते औदुंबरपर्यंत कृष्णा नदीच्या पात्रात अकरा मोठ्या मगरी व सत्तरहून अधिक पिल्ली असल्याचे वन विभागाने पंधरवड्यापूर्वी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या चार वर्षांत मगरीच्या हल्ल्यात आतापर्यंत सहाजणांचा बळी गेला आहे.
याशिवाय मच्छिमार, कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिला, पोहायला गेलेली मुले यांच्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. वन विभागाकडून नदीकाठी पहारा देण्याशिवाय काहीच
होताना दिसत नाही, तर दुसरीकडे मगरींच्या संख्येत वाढ होत असल्याने कृष्णाकाठ भीतीच्या छायेत आहे.
पद्माळे येथील बजरंग पाटील यांचे नदीकाठी शेत आहे. शुक्रवारी या शेतात १३ मगरीची पिल्ली आढळून आली. या पिलांसोबत लहान मुले खेळत होती. पाटील दुपारी शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी मुलांना या पिलांपासून बाजूला केले. त्यानंतर वनविभागाशी संपर्क साधून याची माहिती दिली. सायंकाळपर्यंत वनविभागाचा एकही कर्मचारी आला नाही.
यामुळे पाटील यांनी सर्व पिल्ली पुन्हा नदीत सोडून दिली. पद्माळेत पहिल्यांदाच मगरीची पिल्ली आढळून आली आहेत. यावरून मगरीचे नदीकाठावर वास्तव्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. जेथे पिल्ली सापडली, तेथे अंड्यांची टरफले मात्र आढळून आली नाहीत. (प्रतिनिधी)