gram panchayat election: सांगलीतील कडेगावच्या दोन गावांनी निवडणुकीवर टाकला बहिष्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2022 01:03 PM2022-12-03T13:03:22+5:302022-12-03T13:43:04+5:30
कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.
सांगली : जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सरपंच आणि सदस्यपदांसाठी विक्रमी १३ हजारांवर अर्ज दाखल झाले. अर्ज दाखल करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत तहसील कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांची गर्दी होती. कडेगाव तालुक्यातील दोन गावांनी मूलभूत सुविधांसाठी निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे. काही गावच्या निवडणुका बिनविरोध करण्यासाठी दिवसभर हालचाली चालू होत्या.
जिल्ह्यातील ४५२ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता; पण हरिपूरसह पाच गावांनी आरक्षण सोडतीवर आक्षेप घेतल्यामुळे त्या ग्रामपंचायतींना सध्याच्या ग्रामपंचायत कार्यक्रमातून वगळले आहे. त्यामुळे सध्या ४४७ ग्रामपंचायतींमधील १ हजार ५८८ प्रभागांतील सरपंचासह चार हजार ६५६ जागांसाठी निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखलची प्रक्रिया चालू होती. काही इच्छुकांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केले आहेत. सरपंचासह सदस्य पदासाठी १३ हजारांवर अर्ज दाखल झाले असण्याची शक्यता प्रशासनाकडून वर्तविली आहे.
कडेगाव तालुक्यातील उपाळे (मायणी) आणि शाळगाव येथून एकही अर्ज दाखल नाही. गावांमधील मूलभूत सुविधांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आम्ही निवडणुकीवर बहिष्कार घालत असल्याचा पवित्रा गावातील ग्रामस्थांनी घेतला आहे. वाळवा, जत, आटपाडी, मिरज, शिराळा, खानापूर, कडेगाव, तासगाव, कवठेमहांकाळ आणि पलूस तालुक्यातील दिग्गजांनी अर्ज दाखल केले आहेत. काही जिल्हा परिषद सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे मोठ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका अत्यंत चुरशीच्या होणार आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या अशा आहेत जागा
तालुका | ग्रामपंचायती | सरपंच | सदस्य |
मिरज | ३६ | १५४ | ४५२ |
तासगाव | २६ | ९६ | २८८ |
क. महांकाळ | २८ | ९९ | २७० |
जत | ८१ | २७४ | ८२८ |
खानापूर | ४५ | १४३ | ४२४ |
आटपाडी | २५ | ८२ | २५४ |
पलूस | १५ | ६३ | १८६ |
कडेगाव | ४३ | १४७ | ४४० |
वाळवा | ८८ | ३३५ | १०१० |
शिराळा | ६० | १९५ | ५०४ |
एकूण | ४४७ | १५८८ | ४६५६ |