वारकऱ्यांच्या दिंडीत भरधाव जीप घुसली, २५ वारकरी जखमी; चाैघांची प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2022 07:39 PM2022-07-05T19:39:03+5:302022-07-05T23:47:25+5:30
२५ वारकरी जखमी : चाैघांची प्रकृती गंभीर; दिंडी शाहूवाडी तालुक्यातील; चालक फरार
सांगली/कवठेमहांकाळ : रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर केरेवाडी (ता. कवठेमहांकाळ) येथे भरधाव पीकअप जीप वारकऱ्यांच्या दिंडीत घुसल्याने झालेल्या भीषण अपघातात २५ वारकरी गंभीर जखमी झाले. जखमींपैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना कवठेमहांकाळ व मिरज शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. काेल्हापुर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील ही दिंडी आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा अपघात घडला. अपघातानंतर पीकअपचालक घटनास्थळावरुन पसार झाला.
जखमींमध्ये अक्काताई बाळासाहेब पाटील (६९), अक्काताई अनिल कांबळे (५०), सुशांत सर्जेराव पाटील (२६), प्रकाश रामचंद्र जाधव (६०), सखुबाई शामराव पाटील (६०), बनाबाई पाटील (सर्व रा. शिवरे), सुरेश शिवाजी पाटील (५६), शिवराज बाबासाहेब चाैगुले (५९), शंकर गणपती पाटील (४२, सर्व माणगाव), राजाराम बाबा पाटील (५५, पाटणे), अक्काताई आनंदा नायकवडी (६०, रा. कारंदवाडी), हाैसाबाई नायकवडी (वय ७०), अक्काताई पाटील (५५), सुमन रंगराव कदम (४०), सुशीला सखाराम पालखे (४५), बाळाबाई कदम (४९), सुरेखा प्रकाश पाटील (५०), शंकर मारुती पाटील (४०), बाळु श्रीपती पाटील (४०), जाकाबाई नारायण जाधव (५०) यांच्यासह अन्य काही वारकऱ्यांचा समावेश आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शाहुवाडी तालुक्यातील पवार दिंडी आषाढी एकादशीसाठी पंढरपुरच्या दिशेने मार्गस्थ हाेती. मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पीकअप जीप (क्र. एमएच ०८ डब्लू ५७७१) मिरजहुन पंढरपूरकडे भरधाव वेगाने निघाली हाेती. केरेवाडीजवळ चालकाचा ताबा सुटल्याने पीकअप भरकटली. समाेर असलेल्या माेटारीच्या (क्र. एमएच ०९ ईएम ६२०४) डाव्या बाजुला घासत तशीच पुढे जात वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली. वारकऱ्यांना काही कळण्यापुर्वीच जीप उलटल्याने पंचवीसहुन अधिक वारकरी जीपखाली सापडले. दिंडीत एकच गाेंधळ उडाला. वारकरी या अपघाताने भेदरून गेले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली. जखमींना तातडीने आपत्कालीन रुग्णवाहिकेतुन कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथुन प्रकृती गंभीर असलेल्या रुग्णांना तातडीने मिरज शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आले. जखमींपैकी चाैघांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगण्यात आले. आषाढी वारीसाठी पांडुरंगाच्या भेटीच्या ओढीने पंढरीच्या वाटेवर निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीस अपघात झाल्याचे समजताच पाेलिसांसह प्रशासकीय यंत्रणा तात्काळ अपघातस्थळी दाखल झाली. अपघाताची नाेंद कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यामध्ये झाली असुन अधिक तपास सुरु आहे.
दिंडी शाहुवाडी तालुक्यातील
अपघातग्रस्त दिंडी कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आहे. संत बाळूमामांच्या पादुका घेऊन ही दिंडी निघते. पवार दिंडी नावाने ती ओळखली जाते. शाहूवाडी तालुक्यातील आसपासच्या गावातील वारकरी दीडशेहुन अधिक वारकरी या दिंडीत सहभागी आहेत.