जिल्ह्यात वर्षभरात १३० मोबाइलची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:24 AM2021-02-14T04:24:03+5:302021-02-14T04:24:03+5:30
सांगली : जिल्ह्यात वर्षभरात १३० मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून तांत्रिक तपासाआधारे शोध घेतला जात असला, तरी चोरटे ...
सांगली : जिल्ह्यात वर्षभरात १३० मोबाइल चोरीच्या घटना घडल्या आहेत. पोलिसांकडून तांत्रिक तपासाआधारे शोध घेतला जात असला, तरी चोरटे मोबाइल सुरूच ठेवत नसल्याने तपासात अडचणी येत आहेत. तरीही पोलिसांनी वर्षभरात २३ मोबाइल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. मोबाइलचे बिल नसणे यासह इतर अडचणीमुळे अनेक गुन्ह्यांची नोंदही होत नाही.
प्रत्येकाच्या हातात, खिशात असलेला मोबाइल आता चैनीची नव्हे तर गरजेची वस्तू बनला आहे. नेमकी हीच संधी साधून चोरट्यांकडून मोबाइलवर डल्ला मारला जात आहे. मोबाइलची चोरी केल्यानंतर ते सुरुवातीचे काही महिने अजिबात सुरू केला जात नाही. त्यामुळे पोलिसांच्या तांत्रिक तपासाला अडचणी येतात. त्यात जिल्ह्यातील मोबाइल चोरीचे गुन्हे बघितले तर अल्पवयीन मुलांकडून असे प्रकार अधिक होत आहेत.
चौकट
२०२० मध्ये मोबाइल चोरीचे दाखल गुन्हे
जानेवारी १६
फेब्रुवारी ११
मार्च ०६
एप्रिल ००
मे ०८
जून ०८
जुलै ०६
ऑगस्ट ०६
सप्टेंबर ०६
ऑक्टोबर २३
नोव्हेंबर १७
डिसेंबर २३
चौकट
वर्षात गेलेले १३० मोबाइल, सापडले २३
जिल्ह्यात मोबाइल चोरीच्या घटना वाढत असल्याने या वर्षभरात १३० मोबाइल चोरीच्या घटनांची पोलिसांत नोंद आहे. यापेक्षा अधिक मोबाइलची चोरी झाली असली तरी त्याची नोंद झालेली नाही. बिल नसणे यासह इतर कारणांनी नागरिक पोलिसांत फिर्याद देत नाहीत. तरीही पोलिसांनी या वर्षात २३ मोबाइल शोधून दिले आहेत.
चौकट
आठवडी बाजारातून सर्वाधिक मोबाइल चोरी.
शहरासह जिल्ह्यातील आठवडी बाजारात प्रामुख्याने मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना घडत आहेत. गर्दीचा फायदा घेत बाजारातून मोबाइल लंपास केले जात आहेत. त्यामुळे चोरट्यांना पकडणे आव्हान आहे. याशिवाय शहरात गेल्या काही दिवसांपासून सकाळच्या वेळी उघड्या असलेल्या घरांमध्ये अल्पवयीन मुलांना पाठवून मोबाइल चोरीच्या घटनांत वाढ होत आहे.
कोट
मोबाइल चोरीच्या घटना वाढत असल्या तरी त्याचा तपासही घेतला जातो. काही गुन्ह्यांचा शोध झाला असून इतर तपास सुरू आहे. तरीही नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी सावधानता बाळगावी व पोलिसांकडून वारंवार केले जात असलेल्या आवाहनासही प्रतिसाद द्यावा जेणेकरून मोबाइल चोरीच्या घटना घडणार नाहीत.
-सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा.