महापालिका क्षेत्रात १३८ धोकादायक इमारती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:20+5:302021-05-25T04:31:20+5:30
सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या ...
सांगली : पावसाळापूर्वी धोकादायक इमारतीचा सर्व्हे करण्यात आला असून महापालिका क्षेत्रात १३८ इमारती धोकादायक असल्याचे आढळून आले आहे. या मिळकतधारकांना महापालिकेच्यावतीने नोटिसा बजाविल्या जाणार आहेत. धोकादायक इमारती तत्काळ उतरवून घ्याव्यात, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
धोकादायक इमारत अथवा धोकादायक भाग उतरवून घ्यावा. अतिधोकादायक इमारत तत्काळ रिकामी करून उतरवून घ्यावी. धोकादायक भाग उतरवण्यापूर्वी बाजूच्या इमारतीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जरुरीप्रमाणे टेके द्यावेत. कोणासही धोका पोहोचणार नाही, अशा दृष्टीने सर्व उपाययोजना व तजवीज करावी, असे आवाहन महापालिका प्रभाग समितींच्या सहायक आयुक्तांनी केले आहे.
दरम्यान, महापालिकेने धोकादायक इमारतींच्या मालकांना नोटिसा बजाविण्याचे काम सुरू केले आहे. या नोटिसीत जुलै आणि ऑगस्ट २०१९ मध्ये झालेली अतिवृष्टी व कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे ज्यांच्या इमारती, घरे राहण्यास अत्यंत धोकादायक झालेले आहेत, अशा मिळकतधारकांनी धोकादायक इमारती, घरे तत्काळ उतरवून घ्यावीत. त्याबाबत कार्यवाही न केल्यास व जीवित व वित्तहानी झाल्यास संबंधित मिळकतधारक जबाबदार राहतील. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. खटला भरण्याचा महानगरपालिकेस अधिकार राहील, असे म्हटले आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार धोकादायक, मोडकळीस आलेल्या खासगी इमारतीतील रहिवाशांना स्थलांतरित करावयाची जबाबदारी पोलीस विभागाची आहे. त्यानुसार पोलीस यंत्रणेने ही कार्यवाही करावी, असे आवाहनही महापालिकेने केले आहे.
चौकट
धोकादायक इमारतींचे पुढे काय?
सध्या महापालिकेने धोकादायक व अतिधोकादायक इमारतींना नोटिसा बजाविण्यास सुरुवात केली आहे. नोटिसीनंतर धोकादायक इमारती निष्काशित करण्याची कारवाई केली जाते. जागामालकाने इमारत उतरवून घेतली नाही, तर महापालिकेकडून ती पाडण्यात येते व त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जातो.