कोयना, चांदोलीमध्ये वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:18 AM2021-07-21T04:18:53+5:302021-07-21T04:18:53+5:30
सांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि ...
सांगली : कोयना व चांदोली अभयारण्यात वाघांसाठी १४ हेक्टरचे संरक्षित क्षेत्र तयार केले जात आहे. खाद्य म्हणून सागरेश्वर आणि कात्रज येथून सांबर व चितळ आणून सोडली जातील. हरणांची पैदास वाढल्यानंतर ताडोबा वनक्षेत्रामधून वाघ आणून सोडले जाणार आहेत.
वन्यजीव संवर्धन आराखड्यानुसार राज्यात वाघांचे अधिवास क्षेत्र वाढविण्यात येणार आहे. सध्या ताडोबा वनक्षेत्रात क्षमतेपेक्षा जास्त वाघ नोंदवले गेलेत. चंद्रपूर, गडचिरोलीमध्येही संख्या वाढली आहे. जंगलक्षेत्रातील वाघ मानवी वस्तीत शिरल्याने रहिवासी त्रस्त आहेत; शिवाय जीवितहानीही होत आहे. त्यामुळे वाघांचा समतोल राखण्याचे नियोजन आहे. अतिरिक्त वाघांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे.
पश्चिम महाराष्ट्रात सह्याद्री व्याघ्र प्रकल्प यापूर्वीच घोषित झाला आहे. कोयना आणि चांदोलीचे जंगल त्याअंतर्गत येते. सध्या येथे बिबटे भरपूर आहेत, वाघ मात्र एखादाच आहे. वाघ वाढविण्यासाठी काही वर्षांपूर्वी कात्रजमधून ४० हून अधिक हरणे आणली होती. झोळंबी क्षेत्रात डीअर पार्क तयार केला होता. काही दिवसांनी हरणे जंगलक्षेत्रात सोडली, पण पैदास वाढली की नाही, हे मात्र निश्चित नाही. सोलापूरच्या प्राणीसंग्रहालयातून जास्त झालेले काळवीट आणण्याचे नियोजन प्राधिकरणाच्या नकारामुळे प्रत्यक्षात आले नाही.
चौकट
पाहुण्यांना चांदोली, कोयना मानवणार का?
डेहराडून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडून वाघांच्या पुनर्वसनाचा अभ्यास चार वर्षांपासून सुरू आहे. वाघांचा वावर, सुरक्षितता, खाद्याची उपलब्धता, भविष्यात पैदास होण्यासाठी अनुकूलता, मानवी वस्तीपासून अंतर, शिकारीचे धोके या सर्व बाबींचा अभ्यास सुरू आहे. ताडोबाच्या हवामानातील वाघांना चांदोली, कोयना मानवेल काय, याचाही अदमास घेतला जात आहे. अभ्यास अंतिम टप्प्यात असून, संस्थेने हिरवा कंदील दाखवल्यानंतर नवे पाहुणे चांदोली, कोयनेत रुजू होतील. पर्यटकांना टायगर सफारीचा आनंद घेता येईल.
चौकट
चांदोलीत स्थानिक वाघ नाही
चांदोलीत एखादाच व कोयनेत तीन ते चार वाघ आढळले आहेत, पण ते स्थानिक रहिवासी नाहीत. चांदोली, कोयना, दाजीपूर-राधानगरी, तिलारी हा त्यांचा कॅरिडॉर आहे. ताडोबातून आणलेले वाघही या कॅरिडॉरमध्ये फिरल्यास जास्त संख्येमुळे मानवी वस्त्यांत शिरण्याची शक्यता वन्यजीवप्रेमींनी व्यक्त केली. अर्थात ३१७ चौरस किलोमीटरच्या चांदोलीमध्ये पुरेसे खाद्य मिळाल्यास ते अन्यत्र भटकणार नाहीत, असाही अंदाज आहे.