भूसंपादन मूल्यांकनात १४ लाखांचा फरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:24 AM2021-04-19T04:24:53+5:302021-04-19T04:24:53+5:30

सांगली : मिरजेतील शंभर फुटी रस्त्याच्या भूसंपादनप्रकरणी मालमत्ताधारकाला द्यावयाच्या मोबदल्याचा विषय महापालिकेच्या ऑनलाइन सभेपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, नगररचना ...

14 lakh difference in land acquisition assessment | भूसंपादन मूल्यांकनात १४ लाखांचा फरक

भूसंपादन मूल्यांकनात १४ लाखांचा फरक

googlenewsNext

सांगली : मिरजेतील शंभर फुटी रस्त्याच्या भूसंपादनप्रकरणी मालमत्ताधारकाला द्यावयाच्या मोबदल्याचा विषय महापालिकेच्या ऑनलाइन सभेपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, नगररचना विभागाने केलेले मूल्यांकन व विषयपत्रिकेतील मूल्यांकन यामध्ये तब्बल १४ लाखांची तफावत असल्याने यावरून महासभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मिरजेतील ख्वाजा कॉलनीतून मिरज-कोल्हापूर महामार्गाला जोडणाऱ्या शंभर फुटी रस्त्याच्या भूसंपादनाच्या मान्यतेचा विषय सभेपुढे घेण्यात आला आहे. दोन मालमत्ताधारकांना द्यावयाच्या मोबदल्याबद्दल महापालिकेनेच गोंधळ घातला आहे. मिरजेतील महापालिकेच्या नगररचना विभागाने दोन मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचे मूल्यांकन करताना १ हजार ७१० इतके वार्षिक बाजारमूल्य (रेडीरेकनर) नोंदविले आहे. त्यानुसार दोन्ही जमिनीचे मूल्यांकन ५५ लाख ७४ हजार रुपये झाले आहे. त्यावर दोन वर्षांचे १२ टक्के दराने व्याज गृहीत धरता एकूण मोबदला ५९ लाखांचा नोंदविला आहे.

एकीकडे ५९ लाखांचा हा मोबदला नाेंदविला जात असताना सभेच्या विषयपत्रिकेवरील विषयात एकूण मूल्यांकन ४५ लाख २६ हजार इतके असल्याचे म्हटले आहे. वार्षिक बाजारमूल्य १ हजार ३१० नोंदले आहे. यात तब्बल १४ लाखांचा फरक दिसून येत आहे. त्यामुळे सभेत हा विषय वादळी ठरण्याची चिन्हे दिसत आहे.

चौकट

कार्यालयीन अहवाल दुरुस्त

याप्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाने खुलासा करताना म्हटले आहे की, ऑनलाइन वार्षिक बाजारमूल्य घेताना अभियंत्याकडून दरात चूक झाली होती. सहायक निबंधकांनी ज्यावेळी लेखी स्वरूपात दर दिले, त्यावेळी मूल्यांकन सुधारित करून घेतले आहे. त्याचा अहवालही कार्यालयाकडून पाठविण्यात आला आहे. त्यामुळे विषयपत्रिकेवरील मूल्यांकन योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

चौकट

तेरा सदस्यांच्या सूचना

ऑनलाइन सभेसाठी १ (ज) अंतर्गत १३ सदस्यांचे प्रस्ताव व सूचना महापालिकेने प्रसिद्ध केल्या आहेत. यात काहींनी रस्ते, इमारतींच्या नामकरणाचे प्रस्ताव दिले आहेत, तर काही नगरसेवकांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या नियमानुसार, गुणवत्तेनुसार व सेवाज्येष्ठतेनुसार करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. महापुरुषांचे पूर्णाकृती पुतळे बसविण्याचा प्रस्तावही दिला आहे.

Web Title: 14 lakh difference in land acquisition assessment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.