१८ वर्षांवरील लसीकरणासाठी नवीन १४ केंद्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:23 AM2021-04-26T04:23:37+5:302021-04-26T04:23:37+5:30

सांगली : १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाची मोहीम १ मे पासून सुरू होत आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. ...

14 new centers for vaccination above 18 years of age | १८ वर्षांवरील लसीकरणासाठी नवीन १४ केंद्रे

१८ वर्षांवरील लसीकरणासाठी नवीन १४ केंद्रे

Next

सांगली : १८ वर्षांवरील लोकांच्या लसीकरणाची मोहीम १ मे पासून सुरू होत आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे. लसीकरणासाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नवीन १४ लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहेत, तसेच पारिचारिका, समन्वय, डाटा ऑपरेटर यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत हा आराखडा अंतिम होईल, असे वैद्यकीय अधिकारी डाॅ.वैभव पाटील यांनी सांगितले.

सध्या महापालिका क्षेत्रात २९ खासगी आणि शासकीय केंद्रावर लसीकरण सुरू आहे. यात महापालिकेच्या १६ आरोग्य केंद्रांचाही समावेश आहे. आजअखेर १ लाख ६८ हजार नागरिकांपैकी ९४ हजार ४९८ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४५ वर्षांवरील ५६ टक्के व्यक्तींचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या या आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी मोठी गर्दी आहे. त्यात अनेकदा लस पुरवठ्यात खंड पडत आहे. आता १ मेपासून १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने तयारी सुरू केली आहे.

महापालिकेने प्रत्येक वार्डात एक लसीकरण केंद्र असावे, या दृष्टीने नियोजन हाती घेतले आहे. काही वार्डांत दोन आरोग्य केंद्र आहे. हे वार्ड वगळून इतर वार्डात नवीन लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहे. जवळपास १४ नवीन केंद्र सुरू करण्यात येतील. आवश्यकता भासल्यास या केंद्रांची संख्या वाढविण्याची तयारीही महापालिकेने केली आहे. या प्रत्येक केंद्रावर लस देण्यासाठी दोन आरोग्य कर्मचारी, नोंदणीसाठी दोन कर्मचारी, डाॅक्टर व समन्वयासाठी दोन कर्मचारी असे सात जणांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने तात्पुरती कर्मचारी भरतीही सुरू केली आहे. महापालिकेच्या शिक्षकांना डाटा एन्ट्रीचे काम दिले जाणार आहे. त्यासाठी ३२ शिक्षकांचे प्रशिक्षणही सुरू आहे. येत्या दोन दिवसांत सर्व ती तयारी पूर्ण होईल, असे डाॅ.पाटील यांनी सांगितले.

चौकट

अडीच लाख लोकांचे लसीकरण

सांगली, मिरज, कुपवाड शहरात १८ वर्षांवरील ३ लाख ४२ हजार १८ लाभार्थी आहेत. त्यापैकी ९४ हजार ४९८ जणांचे लसीकरण झाले आहे. अजून २ लाख ४७ हजार ५२० लोकांचे लसीकरण १ मेपासून केले जाणार असल्याचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितले.

Web Title: 14 new centers for vaccination above 18 years of age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.