वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:27 AM2021-05-26T04:27:24+5:302021-05-26T04:27:24+5:30

सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामीण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, ...

14,000 corona patients in 54 days in Valva, Miraj taluka | वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण

वाळवा, मिरज तालुक्यात ५४ दिवसांत १४ हजार कोरोना रुग्ण

Next

सांगली : जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर २० टक्क्यांपर्यंत आहे. याला ग्रामीण भागातील अनियंत्रित फैलाव कारणीभूत ठरला आहे. मिरज, जत, वाळवा आणि तासगाव तालुके रुग्णसंख्येत आघाडीवर आहेत. प्रशासनासाठी ही बाब चिंतेची ठरली आहे.

या चार तालुक्यांचा मृत्युदर सर्वाधिक आहे. १ एप्रिलपासून दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रवेश केला. त्यानंतर महापालिका क्षेत्रात तुलनेने रुग्णसंख्या कमी राहिली. ग्रामीण भाग मात्र झपाट्याने बाधित होत गेला. कुटुंबेच्या कुटुंबे बाधित झाल्याने संख्या वाढली. होम आयसोलेशनमधील रुग्णांवर नियंत्रण न राहिल्याने संसर्ग फैलावला. दुसऱ्या लाटेच्या ५४ दिवसांत वाळवा तालुक्यात सर्वाधिक म्हणजे ७ हजार २७ रुग्ण सापडले आहेत. मिरज तालुक्यात ६ हजार ९१०, तर जतमध्ये ६ हजार ८६३ रुग्ण आढळले आहेत. खानापूर तालुक्यात ५ हजार ८९७ रुग्ण झाले आहेत.

घरगुती विलगीकरणातील रुग्ण बेजबाबदारपणे वागत असल्याने गावोगावी संस्थात्मक विलगीकरण सुरू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत.

शाळा आणि आरोग्य केंद्रांत सोय करण्यास सांगितले आहे. काही गावांनी घरगुती विलगीकरणातील रुग्णांनी संस्थात्मक विलगीकरणात न आल्यास गुन्हे दाखल करण्याचे इशारे दिले आहेत. सुपर स्प्रेडर ठरू पाहणारे छुपे रुग्ण बाहेर आल्याने फैलाव नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा आहे.

चौकट

१ एप्रिलपासूनच्या दुसऱ्या लाटेतील तालुकानिहाय रुग्ण असे : कंसात मृत्यू

आटपाडी ४७७१ (४०), जत ६८६३ (९२), कडेगाव ४१९६ (६२), कवठेमहांकाळ ३३६८ (५१), खानापूर ५८९७ (१२९), मिरज ६९१० (१५३), पलूस २५५१ (६६), शिराळा ३०३१ (४२), तासगाव ४९४७ (११६), वाळवा ७०२७ (१७३), महापालिका क्षेत्र ९१५८ (२७६).

चौकट

शेतवस्तीचे बुरुज ढासळले

शेतातील वस्त्या गावापासून दूर असल्याने पहिल्या लाटेत कोरोना संसर्गापासून सुरक्षित राहिल्या होत्या. दुसऱ्या लाटेतही कोरोना फिरकणार नाही या आत्मविश्वासात रहिवासी बेजबाबदारपणे वागले. मात्र हा अतिआत्मविश्वास नडला. शेतवस्त्यांवरील सुरक्षेचे बुरुज ढासळले. गेल्या दोन महिन्यांत शेतवस्त्यांवर कुटुंबेच्या कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडली आहेत.

चौकट

कवठेमहांकाळ, जत, तासगावमध्ये पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव

कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पुरेशा आरोग्य यंत्रणेचा अभाव आहे. पुरेशी कोविड रुग्णालये, केअर सेंटर्स, संस्थात्मक विलगीकरण कक्ष, कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांची नाकेबंदी याबाबतीत स्थिती चांगली नाही. लोक घरातच राहून उपचार घेत असल्यानेही संसर्ग वाढत आहे.

कोट

घरगुती विलगीकरणापेक्षा संस्थात्मक विलगीकरणाला प्राधान्य देत आहोत. ग्रामपंचायती व कोरोना दक्षता समित्यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा. या केंद्रांसाठी कोणताही विशेष खर्च होणार नसल्याने अडचण यायचे कारण नाही. विशेषत: शाळांच्या इमारतीत केंद्रे सुरू केल्यास संसर्ग रोखण्यास मदत होईल.

- जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

Web Title: 14,000 corona patients in 54 days in Valva, Miraj taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.