कोरोना लसीचे १४,९०० डोस मिळाले, आजपासून लसीकरण पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:25 AM2021-05-24T04:25:24+5:302021-05-24T04:25:24+5:30
सांगली : तब्बल पाच दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्याला कोरोना लसीचे १४ हजार ९०० डोस मिळाले. सर्व लसी कोव्हिशिल्ड आहेत. ...
सांगली : तब्बल पाच दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्याला कोरोना लसीचे १४ हजार ९०० डोस मिळाले. सर्व लसी कोव्हिशिल्ड आहेत. त्यामुळे आज, सोमवारी सकाळपासून जिल्हाभरात लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी सांगितले की, रविवारी दुपारी कोल्हापूरहून लसी प्राप्त झाल्या, त्यानंतर लगेच जिल्हाभरात त्यांचे वितरण सुरू झाले. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालये तसेच महापालिकेलाही लसींचे डोस देण्यात आले. शासनाच्या निर्देशानुसार या लसींमधून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण केले जाईल. त्यांना पहिला व दुसरा डोस मिळणार आहे. पहिला डोस घेतलेल्यांना ८४ दिवस पूर्ण झाल्यावरच दुसरा डोस मिळणार आहे. महापालिकेच्या आरोग्य केंद्रांत नागरिकांची नोंदणी यापूर्वीच करून घेण्यात आली आहे. त्यामुळे निरोप मिळेल त्यानुसार लसीकरणासाठी जायचे आहे.
लस मिळताच काही केंद्रांवर रविवारीच लसीकरण सुरू झाले. त्याशिवाय शिल्लक असणाऱ्या डोसमधूनही काही प्रमाणात लसीकरण झाले.