१५ माजी संचालकांना अंतिम मुदत
By Admin | Published: June 23, 2015 11:46 PM2015-06-23T23:46:40+5:302015-06-24T00:48:32+5:30
वसंतदादा बँक घोटाळा प्रकरण : ७ जुलैला म्हणणे मांडण्याची सूचना
सांगली : येथील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेतील १७० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी मंगळवारी दोन माजी संचालकांसह नऊजणांनी म्हणणे सादर केले. यापूर्वीच्या सुनावणीवेळी काही माजी संचालक व अधिकाऱ्यांनी युक्तिवाद केला होता. उर्वरित १५ माजी संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी ७ जुलै ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. चौकशी अधिकारी आर. डी. रैनाक यांच्यासमोर मंगळवारी सुनावणीचे कामकाज चालू होते. याप्रकरणी ३४ माजी संचालक आणि ७३ कर्मचाऱ्यांना म्हणणे सादर करण्याचे आदेश यापूर्वीच दिले आहेत. मागणीप्रमाणे बहुतांश लोकांना कागदपत्रे दिलेली असल्याने, आता म्हणणे सादर करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. यापूर्वी माजी संचालक व कर्मचाऱ्यांना वेळोवेळी म्हणणे मांडण्यासाठी मुदत देण्यात आली होती. चौकशी अधिकारी रैनाक यांनी, आता यापुढे कोणतीही मुदत मिळणार नाही. ७ जुलैपर्यंत कोणत्याही परिस्थितीत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशी अधिकाऱ्यांच्या या सूचनेस माजी संचालक व त्यांच्या वकिलांनी सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. त्यामुळे ही प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली आहे. वसंतदादा बँकेचे ११ जानेवारी २००८ रोजी विशेष लेखापरीक्षण झाले होते. या लेखापरीक्षणात १७० कोटी रुपयांच्या अनेक नियमबाह्य कामांबाबत आक्षेप नोंदविण्यात आले होते. याच लेखापरीक्षणाआधारे ४ जुलै २००८ रोजी कलम ८८ नुसार चौकशीचे आदेश दिले होते.
दिग्गजांचा समावेश...
माजी मंत्री मदन पाटील, माजी महापौर सुरेश पाटील, महापालिकेचे नगरसेवक सुरेश आवटी, माजी नगरसेविका बेबीताई पाटील, माजी नगरसेवक किरण जगदाळे, कुंदन बापूसाहेब पाटील, मुजीर जांभळीकर, आदी ३४ माजी संचालकांचा या प्रकरणात समावेश आहे.