१५ लाख भाविकांनी घेतले बाहुबलींचे दर्शन : श्रवणबेळगोळमध्ये गर्दीचा ओघ कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 07:54 PM2018-02-20T19:54:08+5:302018-02-20T19:57:06+5:30
शीतल पाटील
श्रवणबेळगोळ : येथील भगवान बाहुबली स्वामी महामस्तकाभिषेक महोत्सवात ७ फेब्रुवारीपासून आजअखेर तब्बल १५ लाख भाविकांनी हजेरी लावली आहे. मुख्य मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांसह राजकीय नेते, लोकप्रतिनिधींची गर्दी वाढू लागली आहे. मंगळवारी चौथ्यादिवशी १००८ कलशांनी बाहुबलींच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक करण्यात आला.
श्रवणबेळगोळ येथे बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सव २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्या नेतृत्वाखाली ७ फेब्रुवारीपासून या महोत्सवाची सुरुवात झाली. सुरुवातीला पंचकल्याण विधी पार पडला. या महोत्सवात ८ ते ९ लाख भाविक सहभागी झाले होते. मस्तकाभिषेकाला सुरुवात झाल्यापासून भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, कोलकाता, दिल्ली, मध्यप्रदेश या राज्यातून भाविक बाहुबलींच्या दर्शनाला येत आहेत. आतापर्यंत १५ लाख लोकांनी सोहळ्याला उपस्थिती लावल्याचे महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. त्यात रविवार, सोमवारी सलग सुटीमुळे लाखो भाविकांनी हजेरी लावली.
सोहळ्यासाठी येणाºया भाविकांना मोफत भोजनाची व्यवस्था केली आहे. २० भोजनगृहात दररोज हजारो लोकांना भोजन वाटप केले जात आहे. त्यागीनगर, कलशनगर, यात्रीनगर, स्वयंसेवकनगर, पंचकल्याणनगरातील सर्व आवास भरले आहेत.
विंध्यगिरी पर्वतासोबतच चंद्रगिरी पर्वतावरही दर्शनासाठी रांगा लागल्या आहेत. चंद्रगिरीवरून मस्तकाभिषेक पाहण्याची सोय केली आहे. तिथे येणाºया लोकांना लिंबू-सरबताचे वाटप केले जात आहे. याची जबाबदारी सांगलीच्या मोहन चौगुले, राजगौंडा पाटील यांच्यावर सोपविली आहे. चंद्रगिरीवर दररोज चिन्मयसागर महाराज (जंगलवाले बाबा) यांचे प्रवचन होत आहे. कर्नाटक सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे चामुंडराय सभामंडपात रोज सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.
अनिवासी भारतीयांना आज अभिषेकाचा मान
बाहुबली मस्तकाभिषेक सोहळ्याच्या चौथ्यादिवशी १००८ कलशांनी अभिषेक करण्यात आला. जल, नारळ पाणी, उसाचा रस, चंदन, केशर अशा विविध द्रव्यांचा अभिषेक झाला. बुधवारी अनिवासी भारतीयांच्या हस्ते अभिषेक होणार आहे. यात १५० अनिवासी भारतीय सहभागी होतील.
श्रवणबेळगोळ येथे मंगळवारी भगवान बाहुबली स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला.
विंध्यगिरी पर्वतावर भगवान बाहुबलींचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची रांग लागली होती.
चंद्रगिरी पर्वतावर भाविकांसाठी सरबताचे वाटप करण्यात येत होते. यावेळी सांगलीचे मोहन चौगुले, राजगौंडा पाटील उपस्थित होते.