फुटबॉल संघाच्या निवडीसाठी ज्योतिषाला चक्क १५ लाख रुपये दिले!
By संतोष भिसे | Published: September 19, 2023 04:15 PM2023-09-19T16:15:09+5:302023-09-19T16:15:43+5:30
महासंघाचे तत्कालीन पदाधिकारी कुशल दास यांनी याची जाहीर कबुली दिली आहे.
सांगली : कुंडली पाहून फुटबॉल संघाची निवड करणारे राष्ट्रीय फुटबॉल प्रशिक्षक ड्रगोर स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. कुंडली पाहण्यासाठी ज्योतिषाला दिलेल्या १५ लाख रुपयांची नुकसान भरपाई स्टीमक आणि भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांकडून वसूल करून घ्यावी अशीही मागणी अंनिसतर्फे डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, फारुख गवंडी आदींनी केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, स्टीमक यांनी आशिया चषक पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस अगोदर संघाची संपूर्ण माहिती भूपेश शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती. त्यानुसार शर्मा याने प्रत्येक खेळाडूच्या ग्रहस्थितीनुसार अंतिम संघात कोण खेळणार? याचे निर्णय सांगितले. महासंघाचे तत्कालीन पदाधिकारी कुशल दास यांनी याची जाहीर कबुली दिली आहे.
अंनिसने म्हटले आहे की, ज्योतिष विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही. ते छद्म विज्ञान आहे. ग्रह, गोल, ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा अशास्त्रीय गोष्टींचा वापर करुन संघ निवडणे चुकीचे आहे. जीवापाड मेहनत करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तृत्वावर अविश्वास व्यक्त करण्यासारखे आहे.प्रसिद्धीपत्रकावर डॉ. संजय निटवे, वाघेश साळुंखे, सुजाता म्हेत्रे, डॉ. शंकर माने, सचिन करगणे, रवी सांगोलकर, सुनील भिंगे यांच्याही सह्या आहेत.
एकीकडे चंद्रयान आणि दुसरीकडे ज्योतिष
डॉ. दाभोलकर यांनी म्हटले आहे की, शासनाने ज्योतिषासारख्या अवैज्ञानिक गोष्टीचा अभ्यासक्रमात समविष्ट करण्याचा प्रकार चालवला आहे, त्यामुळेच त्यांना शासनाची मान्यता मिळत आहे. जन्मवेळ, कुंडली अशा अवैज्ञानिक गोष्टींचे समाजात स्तोम माजत आहे. हे समाजासाठी घातक आहे. एकीकडे चंद्रयान पाठविण्यासारखे विज्ञानवादी उपक्रम राबविले जात असताना फुटबॉल संघासाठी ज्योतिष पाहणे म्हणजे शुद्ध थोतांड आहे.