संख तहसीलची 'ती' १५ गावे पुन्हा 'जत'ला जोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 06:41 PM2022-01-21T18:41:26+5:302022-01-21T18:42:03+5:30
जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती.
जत : संख अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करताना जत जवळची अनेक गावे संख कार्यालयास जोडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर वळसंग हे नवीन मंडल तयार करून त्याला गावे जोडण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यानुसार १५ गावे जतला जोडण्यात आल्याची माहिती आमदार विक्रम सावंत यांनी आज, शुक्रवारी दिली.
काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आप्पाराय्या बिराजदार, मुचंडीचे सरपंच अशोक पाटील यांच्यासह जत आसपासच्या ग्रामस्थांनी संखऐवजी जतला गाव जोडावे असे सूचविले होते. जत जवळील १५ गावे संखऐवजी जत तहसीलला जोडावीत, अशी मागणी होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते.
संख अप्पर तहसील कार्यालयास जोडले गेलेली सनमडी, घोलेश्वर, मायथळ, कुणीकोणूर, आबाचीवाडी, कोळगिरी, काराजनगी, वळसंग, मुचंडी, रावळगुंडवाडी, उंटवाडी, शेड्याळ, सालेकेरी, सोरडी व दरीकोणूर ही गावे जत तहसील कार्यालयास जोडण्याबरोबरच या गावांसाठी वळसंग हे नवीन मंडल तयार करण्यात येणार आहे.
त्याचबरोबर उर्वरित मंडलामधील गावांत फेरबदल प्रस्तावित आहे. यासंदर्भात दावे, हरकती उपविभागीय अधिकारी तुषार ठोंबरे यांनी मागवून घेतल्या होत्या. गुरुवारी शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे.
संखच्या अप्पर तहसील कार्यालयांतर्गत मुचंडी महसूल मंडल रद्द करण्यात येत असून सिद्धनाथ अंतर्गत सिद्धनाथ, जालीहाळ खुर्द व पांढरेवाडी अशी एक सजा व तीन गावे संख मंडलामध्ये समाविष्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे संख मंडलामध्ये एकूण ६ सजे व १५ गावांचा समावेश राहील, असेही आ. सावंत यांनी सांगितले.