चांदोलीच्या पर्यटन विकासासाठी समिती नेमून १५० एकर जमीन उपलब्ध करून देणार - जिल्हाधिकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 05:48 PM2022-09-13T17:48:40+5:302022-09-13T17:49:07+5:30
गंगाराम पाटील वारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार ...
गंगाराम पाटील
वारणावती : चांदोली पर्यटनाला चालना देण्यासाठी समिती नेमून वारणावती येथील १५० एकरचा पर्यटन विकास आराखडा तयार करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिली.
चांदोली पर्यटन विकासाच्या संदर्भात आज, मंगळवारी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी चांदोलीचा दौरा करून पाहणी केली. त्यानंतर वारणावती येथील वनक्षेत्रपाल कार्यालया शेजारील अभ्यागत कक्षात आयोजित बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांशी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन विकास आराखडय़ात अंतर्भूत असणा-या विविध बाबींवर चर्चा केली.
शिराळाची नागपंचमी देश विदेशात प्रसिद्ध असून वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे उत्सवात मनाई करण्यात आली आहे. या उत्सवास पर्याय म्हणून चांदोली येथे पाटबंधारे विभागाची जमीन उपलब्ध करून सर्प उद्यानाची निर्मिती करणे तसेच चांदोली धरणाच्या पायथ्याशी जागा उपलब्ध करून मगर संगोपन केंद्र मगर पार्क तयार करणे, मधुमक्षिका पालन केंद्राची निर्मिती करणे, तरुणांना व या परिसरातील नागरिकांना व्यवसाय व रोजगार उपलब्ध करून देणे कामी योग्य ते प्रशिक्षण तसेच व्यवसाय पूरक सोयी सुविधा जागेसह उपलब्ध करून देणे आदी विविध बाबींवर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी सखोल चर्चा करत त्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सरीता यादव, सहा.जि.नि.अधिकारी निवास यादव, सहा.वनसंरक्षक गणेश पाटोळे, अजित साजणे, चांदोली राष्ट्रीय उद्यानचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता डी.डी.शिंदे, शाखा अभियंता गोरख पाटील, वनपाल हारूण गारदी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.