‘शिवप्रताप मल्टिस्टेट’चा १५० कोटी ठेवींचा टप्पा पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:24 AM2021-04-14T04:24:24+5:302021-04-14T04:24:24+5:30
विटा : सभासदांचा दृढ विश्वास आणि कर्मचाऱ्यांचा पारदर्शक कारभार यामुळे विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेने अल्पावधित गरुडझेप घेतली असून ...
विटा : सभासदांचा दृढ विश्वास आणि कर्मचाऱ्यांचा पारदर्शक कारभार यामुळे विटा येथील शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेने अल्पावधित गरुडझेप घेतली असून मंगळवारी गुढीपाडव्यादिवशी संस्थेने १५० कोटी रुपयांच्या ठेवींचा महत्त्वपूर्ण टप्पा पूर्ण केला असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक विठ्ठलराव साळुंखे यांनी दिली.
विठ्ठलराव साळुंखे म्हणाले, संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रतापराव साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रताप मल्टिस्टेट संस्थेची वाटचाल सुरू आहे. सभासदांच्या संस्थेवर असलेल्या दृढ विश्वासामुळे संस्थेच्या प्रगतीचा आलेख वाढत आहे. संस्थेचे सभासद, संचालक मंडळ आणि कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक व गतिमान कारभारामुळे ‘शिवप्रताप मल्टिस्टेट’ मंगळवारी गुढीपाडव्यादिवशी १५० कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण करू शकली.
शिवप्रताप मल्टिस्टेटची उलाढाल २६० कोटींच्या वर गेली आहे. एकूण १३ शाखा कार्यरत असून नव्याने कर्नाटकातील अथणी व खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे नवीन शाखा लवकरच सुरू करीत आहे. संस्थेच्या स्वमालकीच्या इमारतीचे कामकाज प्रगतिपथावर आहे. चालूवर्षी छोट्या कर्जावर भर दिला असून मायक्रो फायनान्समध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तळागाळापर्यंत त्याचा प्रभाव दिसून येईल व अर्थचक्र गतिमान होईल.
यावेळी साळुंखे यांनी संस्थेच्या सांपत्तिक स्थितीचा आढावा घेतला. संस्थेने १५० कोटी ५० लाखांच्या ठेवी पूर्ण केल्या असून ११० कोटी ९४ लाख कर्ज वाटप केले आहे. ५६ कोटी ३१ लाखांची गुंतवणूक असून १६२ कोटी ५९ लाख रुपयांचे खेळते भांडवल आहे, तर १ कोटी ५१ लाख रुपयांचा नफा झाला असून संस्थेचा ऑडिट वर्ग 'अ' असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो - १३०४२०२१-विटा-प्रतापराव साळुंखे, विटा.
फोटो - १३०४२०२१-विटा-विठ्ठलराव साळुंखे, विटा.