सांगलीत आहेरामध्ये आलेली १५० पाकिटे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:37 PM2019-04-01T13:37:47+5:302019-04-01T13:39:10+5:30
लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
सांगली : लग्नसमारंभात आहेरात आलेली दीडशे पाकिटे लंपास करण्यात आली. सांगलीत शामरावनगरमध्ये सिद्धुसंस्कृती भवन या मंगल कार्यालयातील वरपक्षाच्या खोलीत शनिवारी दुपारी दोन वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी नातेवाईक शुभम मधुकर कदम (वय २२, रा. टाकवडे, ता. शिरोळ) याच्यावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शामरावनगरधील महसूल कॉलनीत सचिन अरविंद खराडे राहतात. त्यांच्या घरात शनिवारी विवाहकार्य होते. यासाठी सिद्धुसंस्कृती भवन हे मंगल कार्यालय घेण्यात आले होते. अक्षता पडल्यानंतर सचिन खराडे यांच्याकडे नातेवाईकांनी आहेराची पाकिटे दिली. अंदाजे दीडशे पाकिटे होती. ही सर्व पाकिटे खराडे यांनी त्यांच्या आजीकडे दिली होती. आजी वरपक्षाच्या खोलीत बसली होती. त्यानंतर ती खोलीतून निघून गेली. दरम्यानच्या काळात चोरट्याने ही सर्व पाकिटे लंपास केली. यामध्ये अंदाजे २५ हजाराची रोकड होती. आजी दोन वाजता पुन्हा वरपक्षाच्या खोलीत आल्यानंतर चोरीचा हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी सचिन खराडे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
नातेवाईकावर संशय
दरम्यान, खराडे यांची आजी वरपक्षाच्या खोलीतून बाहेर पडल्यानंतर आतमध्ये कोणी नसल्याचे पाहून त्यांचा नातेवाईक शुभम कदम हा या खोलीत येऊन गेल्याचे अनेकांनी पाहिले आहे. त्यानेच पाकिटे चोरल्याचा संशय आहे.