उमदी आश्रमशाळेत १५४ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; रूग्णालयात उपचार सुरू
By अशोक डोंबाळे | Published: August 28, 2023 10:30 AM2023-08-28T10:30:26+5:302023-08-28T10:36:58+5:30
जि.प. अध्यक्षा होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून झाली विषबाधा
अशोक डोंबाळे, सांगली: उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना रविवारी जेवणातून विषबाधा झाली असून सर्व विद्यार्थ्यांना जत ग्रामीण रुग्णालय, कवठेमहांकाळ, माडग्याळ, मिरजेतील वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले आहे. उमदी (ता. जत, जि. सांगली) येथील समता अनुदानित आश्रमशाळेतील १५४ विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांच्या मुलाच्या एका कार्यक्रमातील जेवणातून रविवारी (२७) रात्री उशिरा विषबाधा झाल्याची माहिती समोर आली आहे. या विद्यार्थ्यांना तात्काळ ग्रामीण रुग्णालय, माडग्याळ व जत येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तेथे विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चांगली आहे.
एकूण १५४ रुग्णांपैकी मिरज शासकीय रुग्णालय २६, जत ग्रामीण रुग्णालय ५७, कवठेमहांकाळ उपजिल्हा रुग्णालय ४१, माडग्याळ ग्रामीण रुग्णालय २० आणि आश्रम शाळेत १० विद्यार्थीं असे १५४ विद्यार्थ्यांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी दिली. त्यांची प्रकृती चांगली आहे. उर्वरित सर्व रुग्ण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथील रुग्णालयात पाठविण्यात आलेले आहेत.
माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घटनेची माहिती व दखल घेतली असून, विद्यार्थ्यांच्या उपचारांत कोणतीही उणीव ठेवू नये, अशा सूचना त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाची यंत्रणा व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिल्या आहेत. तसेच, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ तासांच्या आत अहवाल सादर करण्याच्या व दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या आहेत.