पवनचक्की कंपनीला १५.४० लाखांचा गंडा
By Admin | Published: March 1, 2016 11:26 PM2016-03-01T23:26:09+5:302016-03-02T00:48:08+5:30
एकाच जमिनीची दोघांना विक्री : बलवडी (खा.) येथील प्रकार
विटा : खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथील एकाच गटातील ९५ आर शेतजमिनीची दोघांना विक्री करून पवनचक्की कंपनीला सुमारे १५ लाख ४० हजार रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला.
बलवडी (खा.) येथील नितीन गायकवाड यांचे अज्ञान पालक वडील सिध्देश्वर काकासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या मालकीची गट नं. ५०७ मधील ९५ गुंठे शेतजमीन दि. १८ सप्टेंबर २००८ रोजी जाधववाडी येथील यशोदा जगन्नाथ जाधव यांना ९५ हजार रुपयांना खरेदी दिली होती. त्यानंतर सिध्देवर गायकवाड हे मृत झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा नितीन हा सज्ञान झाल्यानंतर दि. २१ आॅक्टोबर २००९ रोजी वडिलांनी खरेदी दिलेली शेतजमीन यशोदा जाधव यांच्या नावे नोंद व्हावी, यासाठी नितीन याने प्रतिज्ञापत्र दिले.
दरम्यान, हे सर्व माहिती असतानाही त्याच गट नं. ५०७ मधील ९५ गुंठे शेतजमीन नितीन गायकवाड याने दि. १७ नोव्हेंबर २०१२ ला पुन्हा एस. बी. आदित्य पॉवर प्रोजेक्ट प्रा. लि. या पवनचक्की कंपनीला साठेखत, करारपत्र व कुलमुखत्यारपत्र करून देऊन १५ लाख ४० हजार रुपये कंपनीकडून घेतले. या व्यवहाराला नितीन याची आई श्रीमती अलका गायकवाड यांनी सहमती दिली होती. मात्र, एकाच गटातील शेतजमिनीवर दोघांकडून पैसे उचलल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी दादासाहेब साठे यांनी मंगळवारी विटा पोलिसांत नितीन गायकवाड व श्रीमती अलका गायकवाड यांच्याविरुध्द फिर्याद दिली. याप्रकरणी नितीन व अलका गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, उपनिरीक्षक अमोल शिंदे तपास करीत आहेत. (वार्ताहर)
माय-लेकाविरूध्द गुन्हा
संशयित नितीन सिध्देश्वर गायकवाड व त्याची आई अलका सिध्देश्वर गायकवाड (दोघेही रा. बलवडी-खा.) या दोघा माय-लेकांविरुध्द विटा पोलीस ठाण्यात मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. एस. बी. आदित्य पॉवर प्रोजेक्ट या पवनचक्की कंपनीचे सुपरवायझर दादासाहेब साठे यांनी फिर्याद दिली आहे.