सांगलीत तीन कॅफे फोडले, १६ कार्यकर्ते ताब्यात; अत्याचारप्रकरणी संतप्त 'शिवप्रतिष्ठान युवा'चा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2024 05:25 PM2024-05-18T17:25:02+5:302024-05-18T17:25:20+5:30

कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस

16 activists of Shiv Pratishthan Yuva detained in connection with breaking into three cafes in Sangli | सांगलीत तीन कॅफे फोडले, १६ कार्यकर्ते ताब्यात; अत्याचारप्रकरणी संतप्त 'शिवप्रतिष्ठान युवा'चा हल्लाबोल

सांगलीत तीन कॅफे फोडले, १६ कार्यकर्ते ताब्यात; अत्याचारप्रकरणी संतप्त 'शिवप्रतिष्ठान युवा'चा हल्लाबोल

सांगली : सांगलीतील कॅफेमध्ये गुंगीचे औषध देऊन युवतीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आल्यानंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शंभरफुटी रस्त्यावरील ‘हॅंग ऑन’ कॅफेवर हल्लाबोल केला. सर्व केबिन, फर्निचर व साहित्याची तोडफोड केली. पोलिस घटनास्थळी येऊन पाहणी करत असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक गाठला. खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील डेनिस्को आणि कॅफे सनशाईनची ही तोडफोड केली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.

अधिक माहिती अशी, शंभरफुटी रस्त्यावरील ‘हँग ऑन’ कॅफेमध्ये कॉफीतून गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित युवतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संशयित आशिष शरद चव्हाण (वय २५, रा. बस्तवडे, ता. तासगाव) याच्याविरुद्ध बलात्कार आणि ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत माहिती मिळताच शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास ‘हॅंग ऑन’ कॅफेवर हल्लाबोल केला. जोरदार घोषणाबाजी करत तोडफोड सुरू केली. आतील छोट्या केबिन, सिलिंग उचकटून टाकले. खुर्च्या बाहेर आणून तोडल्या. काचांचा चक्काचूर करून टाकला. फर्निचरसह बाहेरील फलक फोडून टाकला. अवघ्या काही मिनिटात कॅफे उद्ध्वस्त करून टाकला. तेवढ्यात विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांची चौकशी सुरू असतानाच कार्यकर्त्यांनी विश्रामबाग चौक परिसरात खरे मंगल कार्यालयाजवळील इमारतीतील कॅफेवर हल्लाबोल केला.

एकाच इमारतीमध्ये असलेल्या डेनिस्को आणि कॅफे सनशाईनमध्ये घुसून सर्व केबिन्स उद्ध्वस्त करून टाकल्या. फर्निचर, खुर्च्यासह साहित्याची तोडफोड केली. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तेवढ्यात विश्रामबाग पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी तोडफोड करणाऱ्या १६ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांना विश्रामबाग पोलिस ठाण्यात आणले. घटनेची माहिती मिळताच अप्पर अधीक्षक रितू खोखर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.

सांगलीतील अनेक कॅफे मिनी लाॅज बनले आहेत. येथे लैंगिक चाळ्यासाठी केबिन दिल्या जातात. हे कॅफे बंद करण्यासाठी संघटनेने विशेष पोलिस महानिरीक्षक, अधीक्षक यांच्यासह गृहमंत्र्यांना निवेदन दिले आहे. परंतु पोलिस हप्ते घेऊन कारवाई करत नाहीत. त्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले. यापुढेही कॅफेत गैरप्रकार सुरु राहिल्यास तोडफोड केली जाईल. -रणजीत चव्हाण, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान.
 

जिल्ह्यात अशा प्रकारे शेकडो कॅफे सुरु आहेत. तेथेही आम्हाला आंदोलन करावे लागेल. अवैध प्रकार चालणारे कॅफे तत्काळ बंद करावेत. सांगलीतील बलात्कार प्रकरणी कॅफे मालकावर ही गुन्हा दाखल करुन सहआरोपी करावे. -दिगंबर साळुंखे, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान.

Web Title: 16 activists of Shiv Pratishthan Yuva detained in connection with breaking into three cafes in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.