सोलापूरच्या १८८ कर्जदारांकडे १६ कोटींचे व्याज थकीत, सांगली प्राथमिक शिक्षक बँकेच्या अडचणींत वाढ
By अशोक डोंबाळे | Published: May 20, 2024 06:38 PM2024-05-20T18:38:29+5:302024-05-20T18:41:00+5:30
सांगली : येथील प्राथमिक शिक्षक बँकेचे सोलापूर जिल्ह्यातील १८८ शिक्षक कर्जदारांकडे केवळ व्याज १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. तत्कालीन ...
सांगली : येथील प्राथमिक शिक्षकबँकेचेसोलापूर जिल्ह्यातील १८८ शिक्षक कर्जदारांकडे केवळ व्याज १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. तत्कालीन शिक्षक समितीच्या या कारभारामुळे शिक्षक बँकेचा कारभार सुरळीत आणताना खूप अडचणी येत आहेत. तरीही बँकेला या आर्थिक वर्षात पाच कोटी ८० लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. गतवर्षीपेक्षा दोन कोटी ७० लाख रुपयांची नफा घटला आहे.
विनायक शिंदे म्हणाले, शिक्षक समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांना ९० कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे. यापैकी १८८ कर्जदारांकडे केवळ ‘एनपीए’चे व्याजच १६ कोटी रुपयांचे थकीत आहे. यासह ठेवीवरील व्याजदर ६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत केला आहे. ठेवींवरील व्याजदर वाढविताना कर्जाचा व्याजदर पूर्वीप्रमाणेच ठेवला आहे. यामुळे गतवर्षीपेक्षा यावर्षी दोन कोटी ७० लाख रुपयांनी नफा घटला आहे.
गतवर्षीच्या आर्थिक वर्षात आठ कोटी ५० लाख रुपयांचा नफा झाला होता; पण यावर्षी पाच कोटी ८० लाख ५८ हजार रुपयांचा नफा झाला आहे. बँकेचा नेट एनपीए १.७० टक्के, तर ग्रॉस एनपीए ४.४० टक्के झाला आहे. एनपीए कमी करण्यासाठी बँकेच्या संचालक मंडळाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी स्टेशनरी, छापाई खर्चात कपात केली आहे. कर्मचाऱ्यांना वेतनवाढ दिली; पण बोनस, बक्षीस, पगार देण्याची पद्धती बंद केली आहे. यामुळे बँकेचे जवळपास एक कोटी रुपये वाचणार आहेत. तसेच सोलापूर जिल्ह्यातील कर्जदारांची थकीत रक्कम वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. वर्षभरात निश्चित थकबाकीचा आकडा कमी करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षक बँकेच्या उपाध्यक्षा अनिता काटे, संचालक अविनाश गुरव, शब्बीर तांबोळी, मुश्ताक पटेल, तानाजी खोत, हंबीरराव पवार, महादेव हेगडे, सलीम मुल्ला, गांधी चौगुले आदी उपस्थित होते.
सभेत थकबाकीदारांच्या नावांचे वाचन करणार
प्राथमिक शिक्षक बँकेकडील थकबाकीदारांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी थकबाकीदारांच्या सर्व नावांचे शिक्षक बँकेच्या सर्वसाधारण सभेत वाचनच करणार आहे, असेही विनायक शिंदे म्हणाले.