डाळिंब उत्पादकांची १६ लाखांची फसवणूक

By admin | Published: May 7, 2017 11:59 PM2017-05-07T23:59:51+5:302017-05-07T23:59:51+5:30

डाळिंब उत्पादकांची १६ लाखांची फसवणूक

16 million cheating of pomegranate growers | डाळिंब उत्पादकांची १६ लाखांची फसवणूक

डाळिंब उत्पादकांची १६ लाखांची फसवणूक

Next


गजानन पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : तासगाव तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांना ७१ लाखांचा चुना द्राक्ष दलालांनी लावल्याची घटना ताजी असतानाच, जत तालुक्यातील दरीबडची परिसरातही व्यापाऱ्यांनी डाळिंब बागायतदार शेतकऱ्यांची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर येत आहे. वारंवार घडणाऱ्या या फसवणुकीच्या घटनांवरुन तरी शेतकरी, कृषी उत्पन्न बाजार समिती योग्य तो बोध घेईल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आधीच अडचणीत असलेला शेतकरी या फसवणुकीच्या प्रकारांमुळे उद्ध्वस्त होत आहे. गेल्या काही वर्षातील शेतकऱ्यांच्या फसवणुकीची प्रकरणे पाहता, अजून किती फसवणूक सोसायची? शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रयत्न करुनही फसवणुकीचे दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत.
कायम दुष्काळी परिस्थिती, प्रतिकूल हवामानाला तोंड देत, शेतीला तंत्रज्ञानाची जोड देत जत तालुक्यातील शेतकरी दर्जेदार डाळिंबे व द्राक्षे पिकविताना दिसत आहेत. आपल्या कष्टाचे चीज व्हावे, दोन पैसे जास्त मिळतील, या हेतूने येथील कष्टाळू शेतकरी सातासमुद्रापार डाळिंब, द्राक्षे निर्यातीसाठी प्रयत्न करताना दिसतात. असे असले तरी व्यापाऱ्यांच्या दुष्टचक्रातून तयार माल बाजारपेठेपर्यंत पोहोचविताना मात्र हाच शेतकरी अगतिक झालेला असतो. परिणामी दरवर्षी डाळिंब बागायतदारांच्या फसवणुकीचे सत्र काही थांबताना दिसत नाही. प्रत्येकवेळी वेगवेगळ्या प्रांतातून आलेले एजंट शेतकऱ्यांचा विश्वास संपादन करून दरवेळी नवीन पद्धतीने त्यांची फसवणूक करताना दिसतात. दोन पैसे जास्त मिळणार, या आशेवर असलेले शेतकरी हमखास या एजंटांच्या जाळ्यात अडकतात.
वर्षभर काबाडकष्ट करुन शेतकरी डाळिंबाचे पीक घेतो. विक्रीवेळी व्यापारी, दलाल स्थानिक ओळखीने या शेतकऱ्यांशी संपर्क साधतात. बाग किरकोळ किंवा ठोक पद्धतीने खरेदी केली जाते. बाग खरेदीची आगाऊ रक्कम म्हणून १० ते २० हजार रुपये दिले जातात. शेतकऱ्याचा विश्वास संपादन करुन डाळिंब, द्राक्षे उधारीवर नेली जातात आणि नंतर पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जाते. प्रत्येकवर्षी नवा दलाल नव्या पध्दतीने शेतकऱ्यांना फसवताना दिसतो. यापूर्वी फसवणूक झालेले शेतकरी आता सावधानता बाळगत असले तरी, नवीन बागायतदार मात्र हमखास अशा एजंटांच्या जाळ्यात अडकतात. यावर्षीही परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची सुमारे १६ लाखाची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
बेंगलोर, लखनौ, दिल्ली, कोलकात्ता, हैदराबादपासून स्थानिक मुंबईतील दलालही यामध्ये मागे नाहीत. नाशवंत माल असल्याने वेळेत डाळिंब, द्राक्षे जावीत यासाठी शेतकरी दलाल, व्यापाऱ्यांमागे फिरत असतात. दलालांच्या मोठ्या गाड्या, गळ्यात सोन्याची चेन, तोंडात साखर आणि मोठमोठ्या रकमांचे आकडे यामुळे शेतकरी भुलतात. त्या दलालांचे पूर्ण नाव आणि गावही माहीत नसते. ते कुणाला आणि कुठल्या गावाला माल पाठवितात, हेही माहिती नसते. माल गेल्यानंतर शेतकऱ्यांना तो थोडी रक्कम देतो. वर्ष-सहा महिने वाट पाहायला लावतो. दर कमी झाल्याने मला तोटा झाला, म्हणून पैसे सोडण्याची मागणी करतो. अशा अनेक शेतकऱ्यांचे मिळून लाखो रुपये दिले जात नाहीत. मग शेतकऱ्यांची फसवणूक होते.
या पार्श्वभूमीवर फसवणूक झाल्यास दाद ना फिर्याद. शोधायला गेल्यास दलाल सापडत नाहीत. पत्ते खोटे असतात आणि सापडल्यास तेथील पोलिसांच्या मदतीने हाकलून लावले जाते. पोलिसही गुन्हा नोंद करुन घेत नाहीत. नोंद झाली तरी तपासही होत नाही.
नोटाबंदीचे कारण सांगत तालुक्यामध्ये डाळिंब व द्राक्ष व्यापाऱ्यांची सर्वाधिक फसवणूक यावर्षी झालेली आहे. दरीबडची येथील शेतकऱ्यांना १६ लाखांचा गंडा घातला आहे. नोटाबंदीमुळे रोखीने व्यवहार करता येत नाहीत. कॅ शलेस व्यवहार करावा लागणार. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे घेऊही पैसे दिलेले नाहीत. फसवणुकीची पोलिस ठाण्याला तक्रार केली जात नाही. जिल्ह्यामध्ये तासगाव येथे गुजरातच्या एका व्यापाऱ्याने वेगवेगळ्या भागातील शेतकऱ्यांची ५२ लाखांची फसवणूक केली आहे. तसेच मणेराजुरी भागातील शेतकऱ्यांना उत्तर प्रदेशातील एका दलालाने २२ लाखांचा गंडा घातला आहे.
तालुक्यामध्ये डाळिंब व द्राक्ष व्यापाऱ्यांना माल खरेदी करण्यासाठी कोणतीच नोंदणी केलेली नसते. त्यांच्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे व पणनचे नियंत्रण नसते. त्यामुळे सहजा-सहजी फसवणूक करणे व्यापाऱ्यांना शक्य होते. बाजार समिती आणि पोलिस ठाण्याने दलाल, व्यापाऱ्यांना ओळखपत्रे असल्याशिवाय द्राक्षे, डाळिंब देऊ नयेत, अशा नियमावलीची गरज आहे. व्यवहार रोखीने करण्याची व्यापाऱ्यांना सक्ती करण्याची गरज आहे.

Web Title: 16 million cheating of pomegranate growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.