बदलीचे १६१ शिक्षक लटकले
By admin | Published: July 14, 2017 11:06 PM2017-07-14T23:06:02+5:302017-07-14T23:06:02+5:30
बदलीचे १६१ शिक्षक लटकले
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : आंतरजिल्हा बदलीचे आदेश जिल्हा परिषदेतून बाहेर पडले. मात्र दि. ५ जुलैला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची सही झालेले हे आदेश अद्यापही पंचायत समिती पातळीवर अडकले आहेत. आटपाडी, शिराळा तालुक्यातून एकाही शिक्षकास सोडण्यात आले नसून, वादानंतर जतमधील ३९ शिक्षकांना सोडण्यात आले. प्रशासनाने आदेश देऊन आठ दिवस झाले तरी २८९ पैकी १२८ शिक्षकांना सोडण्यात आले. १६१ शिक्षक कार्यमुक्तीविना लटकले आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडील आंतरजिल्हा बदलीचे प्रस्ताव वर्षभर रखडले होते. २८९ शिक्षकांना त्यांच्या स्वजिल्ह्यात जाण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आले. त्या शिक्षकांनी स्वजिल्ह्यात जाण्याची सर्व ती प्रशासकीय पूर्तता केली, मात्र प्राथमिक शिक्षणमध्ये प्रस्ताव अडकले होते. या शिक्षकांना सोडले तर, जिल्ह्यात शिक्षकांची संख्या कमी होईल, अशी भूमिका घेण्यात आली. प्रत्यक्षात त्यामागे अन्य हेतू असल्याची चर्चा रंगली. याबाबत काही प्रकरणे अध्यक्ष संग्रामसिंंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांच्यापर्यंत गेली. शिक्षण सभापती व शिक्षणाधिकारी त्या शिक्षकांना सोडू नये, या मुद्द्यावर ठाम होते. सामान्य प्रशासनाने शासनाच्या आदेशाप्रमाणे त्या शिक्षकांना सोडावे लागेल, अशी भूमिका मांडली. मुख्य कार्यकारी अधिकारी राऊत यांच्यासमोरच शिक्षण सभापती तमन्नगौडा रवी-पाटील व सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश जोशी यांच्यात खडाजंगी झाली. अखेर दि. ५ जुलैला रात्री संबंधित सर्व २८९ शिक्षकांना सोडण्याचा निर्णय राऊत यांनी दिला. त्यानंतर विषय शिक्षक वगळता इतर सर्व शिक्षकांना सोडण्याचे आदेश पंचायत समित्यांकडे देण्यात आले.
जिल्हा परिषदेकडून पंचायत समित्यांना आदेश आले, मात्र पुन्हा तेथेच अडकले. या शिक्षकांना सोडले तर, तालुक्यात शिक्षक कमी पडतात. शाळा बंद ठेवाव्या लागतील, अशी भूमिका पंचायत समितीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे आणि ती योग्यही आहे.
जत, शिराळा व आटपाडी याठिकाणी तसा आग्रह होता. त्यामुळे जिल्हा परिषदेतील या २८९ शिक्षकांची रोजची हजेरी संपली आणि पंचायत समित्यांमध्ये सुरू झाली. अद्याप काही तालुक्यांमध्ये एकाही शिक्षकाला सोडलेले नाही. खानापूर, मिरज, वाळवा, तासगाव या ठिकाणचे सर्व शिक्षक सोडण्यात आले. शिराळा, आटपाडीतील एकाही शिक्षकास सोडलेले नाही. जत तालुक्यातून ९१ पैकी ३९ शिक्षकांना सोडण्यात आले.
अन्य जिल्ह्यातून : २२ शिक्षकच हजर
आंतरजिल्हा बदलीने जिल्ह्यात येणाऱ्या शिक्षकांची संख्या २४९ आहे. यापैकी २२ शिक्षक आले आहेत. मिरज, वाळवा या सधन तालुक्यात येण्यासाठी इच्छुकांची संख्या मोठी असते. त्यामुळे अशा तालुक्यांमधून जाणाऱ्या शिक्षकांना तात्काळ सोडण्यात आले आहे. जत, शिराळा या ठिकाणी येणाऱ्या शिक्षकांची संख्या कमी असते, त्यामुळे तेथील शिक्षकांना सोडलेले नाही. जिल्ह्यातून बाहेर जाणारे १६१ शिक्षक कार्यमुक्तीविना लटकले असल्याने त्यावर तात्काळ मार्ग काढण्याची मागणी केली जात आहे.