सांगली लोकसभेसाठी १६.६१ टक्के मतदान, नवमतदारांनी जल्लोषात बजावला मतदानाचा हक्क
By अशोक डोंबाळे | Published: May 7, 2024 11:50 AM2024-05-07T11:50:14+5:302024-05-07T11:51:34+5:30
मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या
सांगली : सांगली लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी सकाळपासून उत्साहात मतदान सुरू झाले आहे. सकाळी ९ वाजेपर्यंतच्या दोन तासात केवळ ५.८१ टक्के मतदान झाले होते. साडेनऊ नंतर मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी झाल्यामुळे ११ वाजेपर्यंत सरासरी १६.६१ टक्केपर्यंत मतदान झाले. अनेक ठिकाणी मतदानासाठी रांगा दिसून आल्या.
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही मतदानाचा उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदारांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत या दोन तासात मतदारसंघात सरासरी ५.८१ टक्के मतदान झाल्याची माहिती देण्यात आली आहे. सकाळी साडेदहा वाजता मतदान केंद्रावर मतदारांनी रांगा केल्या होत्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १६.६१ टक्के मतदान झाले होते. सद्या सांगली, मिरज शहरासह जिल्ह्यातील मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत.
नवमतदारांचा जल्लोष
नवमतदारांनी शहरासह जिल्ह्यातील अनेक मतदार केंद्रावर जल्लोषात मतदानाचा हक्क बजावला. मतदानानंतर तरुणांनी छायाचित्र काढून सोशल माध्यमावर प्रसिध्दही केले. आम्ही मतदान केले, तुम्ही मतदानाचा हक्क बजावा, असा संदेशही तरुण देत होते.