आबांच्या स्मारकाचे १६ रोजी भूमिपूजन
By admin | Published: August 8, 2016 11:17 PM2016-08-08T23:17:37+5:302016-08-08T23:36:22+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक : एका वर्षात काम पूर्ण करण्याचा निर्णय
सांगली : माजी मंत्री आर. आर. पाटील यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शहरातील महात्मा गांधी वसतिगृह परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाचे मंगळवार, दि. १६ आॅगस्टला, आबांच्या जयंतीदिनी भूमिपूजन करण्यात येणार आहे. सोमवारी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबाबतचे नियोजन करण्यात आले. एका वर्षात स्मारकाचे काम पूर्ण करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
भूमिपूजन कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांच्या उपस्थितीतही एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले. १२ आॅगस्टला मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्री जिल्हा दौऱ्यावर येणार असून त्यांच्याकडून स्मारक स्थळाची पाहणी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
राज्य शासनाने आबांच्या स्मारकाला दहा कोटींच्या निधीला मंजुरी दिली असून यातील पाच कोटी रूपये निधी प्राप्त झाला आहे. स्मारकामध्ये संग्रहालय, सभागृह, ग्रंथालय, कलादालन, ज्यामध्ये आर. आर. आबांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या चित्रांचा समावेश असणार आहे. स्मारकाला देण्यात येणारा रंगही आबांच्या स्वच्छ प्रतिमेला साजेसा असा पांढरा देण्यात येणार असून स्मारकाला विधानभवनाप्रमाणे आकार देण्याचा आराखडा यावेळी सादर करण्यात आला.
आ. सुमनताई पाटील यांनी सांगितले की, आबांच्या जयंतीदिनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन होणार असून एका वर्षाच्या आत स्मारकाचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. केवळ स्मारकाचे बांधकाम न करता वसतिगृहसुध्दा अद्ययावत करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्वसामान्यांना, विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल असे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
यावेळी जिल्हा बॅँकेचे संचालक सुरेश पाटील, स्मिता पाटील, ताजुद्दिन तांबोळी, वास्तुविशारद प्रमोद चौगुले उपस्थित होते. (प्रतिनिधी)
ुवसतिगृहाला नाव द्या
गांधी वसतिगृहाच्या जागेवर होणाऱ्या आर. आर. पाटील यांच्या स्मारकास विरोध नाही. मात्र, याठिकाणी होणारे स्मारक वसतिगृहरूपी होऊन त्याचा केवळ शैक्षणिक कारणासाठीच उपयोग व्हावा, अशी मागणी महात्मा गांधी वसतिगृह बचाव आजी-माजी विद्यार्थी कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. स्मारकाची उभारणी करताना वसतिगृहाची क्षमता वाढविण्यासाठीही प्रयत्न झाले पाहिजेत. सध्या १५० विद्यार्थी राहू शकतात. पण हजार विद्यार्थी राहू शकतील असे वसतिगृह बांधून त्याला आबांचे नाव देण्याची मागणीही करण्यात आली. समितीचे महेश खराडे, कबीर मुलाणी, प्रतीक पाटील, सागर चव्हाण, विजय गडदे आदींनी हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.