ऊस वाहतूक ठेकेदारांना १७ लाखांचा गंडा
By Admin | Published: July 9, 2017 12:12 AM2017-07-09T00:12:15+5:302017-07-09T00:20:23+5:30
तिघांविरुद्ध गुन्हा : मजूर पुरविण्याचे आमिष; ठेकेदार म्हैसाळ येथील
लोकमत न्यूज नेटवर्क
मिरज : ऊस तोडणी कामगारांचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून म्हैसाळ (ता. मिरज) येथील दिलीप दुंडाप्पा कोरे, रावसाहेब इराप्पा शहापुरे व संजय जयवंत शिंदे या तीन ऊस वाहतूक ठेकेदारांना साडेसतरा लाखांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी जामनेर व पाचोरी येथील तिघांविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेनफड सुलेमान तडवी, शामधर रमजान तडवी (दोघे रा. जामनेर, जि. जळगाव) व मधुकर चंद्रसिंग पाटील (पाचोरा, जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या ठकसेनांची नावे आहेत. इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील पंचगंगा साखर कारखाना व आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे साखर कारखान्यास ऊस वाहतुकीसाठी फिर्यादींनी भाड्याने ट्रॅक्टर लावले होते. ऊस वाहतुकीसाठी या तिघांना ऊस तोडणी मजूरांची गरज होती. त्यासाठी या तिघांनी संशयित शेनफड तडवी, शामधर तडवी व मधुकर पाटील या ऊसतोड मजूर पुरविणाऱ्या ठेकेदारांशी संपर्क साधला.
तडवी व पाटील यांनी कमी दरात म्हणजे ३५ हजारात मजुरांची एक जोडी पुरवितो, असे सांगून शंभर ऊसतोड मजूर देण्यासाठी तिघांकडून साडेसतरा लाख रुपये रोख रक्कम घेतली. मजूर पुरविण्यासाठी रक्कम घेतल्याचे त्यांनी लिहूनही घेतले. गतवर्षी २५ ते ते २९ सप्टेंबर २०१६ या कालावधीत हा व्यवहार झाला होता; पण प्रत्यक्षात संशयितांनी मजूर पुरविलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पैशाची मागणी करण्यात आली; पण ते पैसे देण्यास टाळाटाळ करीत होते. त्यामुळे ऊस वाहतूकदार तीनही ठेकेदारांनी शुक्रवारी रात्री मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
दक्षिण महाराष्ट्रात ऊस तोडणी मजूरांची टोळी देतो असे सांगून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर, ट्रक मालकांची फसवणूक करण्याचे प्रकार दरवर्षी घडतात. या प्रकारांना आळा घालण्यात पोलिसांनाही अपयश आले आहे.