घरच्या ओढीने १,७०० किलोमीटर सायकल प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 12:22 AM2020-04-13T00:22:04+5:302020-04-13T00:22:17+5:30
लॉकडाउनमुळे गेला रोजगार; तरुणाने गाठले सांगलीहून ओडिशातील बदसुराई गाव
चंद्रकांत कित्तुरे ।
कोल्हापूर : कोरोनाला रोखण्यासाठी देशभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर त्याचा रोजगार गेला. घरी बसून रहायचे हातात केवळ तीन हजार रुपये. गावी जायेच तर ते १७०० किलोमीटरवर. वाहन किंवा रेल्वेने जायचे तर तो मार्गही बंद झालेला. काय करायचे ? कसे दिवस काढायचे? या चिंतेत कसाबसा आठवडा काढला. असेच बसून राहिले तर जगायचे कसे असा प्रश्न काळीज पोखरू लागला. अखेर निर्णय घेतला, गावी जायचे. तेही सायकलने. अखेर १७०० किलोमीटर सायकलवरुन प्रवास करत आपले गाव गाठला.
ही कहाणी आहे सांगलीतील एका फौंड्रीत रोजंदार म्हणून काम करणाऱ्या २० वर्षीय महेश जेना या तरुणाची. महेश रोजगारासाठी सात महिन्यांपूर्वी मित्रांसमवेत रेल्वेने सांगलीत आला. कुपवाड एमआयडीसीत एका फौंड्रीत काम करु लागला. महिन्याला १५ हजार रुपये पगार. जाण्यायेण्यासाठी त्याने एक जुनी सायकल १५०० रुपयांना विकत घेतली. लॉकडाऊननंतर कंपनीने पुढील आदेश येईपर्यंत कामावर येवू नका, असे सांगितले.
सोलापूर, हैदराबाद, श्रीकाकुलम, गंजममार्गे ओडिशातील बदसुराईमार्गे तो गावाच्या वेशीवर सात एप्रिलला सायंकाळी पोहोचला. मात्र ग्रामस्थांनी वेशीवरच त्याला अडविले. पोलिसांनी तातडीने येवून त्याला ताब्यात घेतले. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत. अखेर होम क्वारंटाईनचा शिक्का मारुन त्याला विचित्रपूर येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. क्वारंटाईनमध्ये पाच दिवस गेले आहेत आणखी नऊ दिवसांनी तो त्याच्या घरात पोहोचेल.
दररोज सोळा तास प्रवास
किमान १५ दिवस तरी घरी पोहोचायला लागतील, असे महेशला जाताना वाटले होते. रस्त्यावर एखाद्या संस्थेकडून मिळणारे अन्नाचे पाकिट घेवून पोटाची भूक भागविली.
रात्री बाराच्या सुमारास धाब्यावर, एखाद्या मंदिरात किंवा रस्त्याकडेला झाडाखाली रात्र घालवायची असा सुमारे दररोज १६ तास सलग सात दिवस त्याने सायकल प्रवास केला.