तासगावच्या बाह्य वळण रस्त्यासाठी १७३ कोटी रूपये मंजूर - नितीन गडकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2024 12:06 PM2024-10-05T12:06:20+5:302024-10-05T12:07:14+5:30
दहिवडी ते विटा राष्ट्रीय महामार्गाचे भूमिपूजन
विटा : तासगाव शहरासाठी बाह्य वळण (रिंग रोड) रस्त्याबाबत तेथील स्थानिक आमदारांनी अनेकवेळा माझी भेट घेतली होती. त्यानंतर आता तासगावच्या बाह्य वळणच्या ७ किलोमीटर (रिंगरोड) रस्त्यासाठी १७३ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भूसंपादनाचे काम सुरू आहे. लोकांनी सहकार्य केल्यास लवकरच या रिंगरोडचे काम पूर्ण होईल, असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
विटा येथे शुक्रवारी दहिवडी, मायणी ते विटा या राष्ट्रीय महामार्ग क्र. १६० चे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री गडकरी बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे, खा. विशाल पाटील, दिलीप येळगावकर, सुहास बाबर, राजाराम गरूड, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते.
मंत्री गडकरी म्हणाले, सांगली जिल्ह्यात एकंदरीत महामार्गाची लांबी पूर्वी ३६ कि. मी. होती. ती आता ६०० कि.मी.पर्यंत पोहोचली आहे. विशेषत: जिल्ह्यातील मागास भागाचा फायदा होईल. मुंबई ते पुणे व बेंगलोर या नवीन द्रुतगती राष्ट्रीय महामार्गाची बांधणी करणार आहे. मुंबईहून निघताना अटल सेतूवरून उतरल्याबरोबर मुंबई ते पुणे महामार्गाला समांतर असा हा द्रुतगती महामार्ग बांधत आहोत. हा महामार्ग पुणे येथील बाह्य वळण रस्त्याला येऊन तेथून नवीन पुणे ते बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तयार होणार आहे.
मुंबईच्या जेएनपीटी चौक ते शिवरे या भागाचा डीपीआर पूर्ण झाला आहे. महिनाभरात १० हजार कोटी रुपयांचे पहिले काम सुरू होणार आहे. उर्वरित ५० हजार कोटींचे काम पुढील ६ महिन्यांत पूर्ण करणार आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला याचा फायदा होणार आहे.
टेंभूसह ताकारी, म्हैसाळला मीच निधी दिला
मी जलसंधारण मंत्री असताना या भागातील म्हैसाळ, टेंभू, ताकारी योजना मंजूर करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आज सर्व ठिकाणी हिरवेगार शिवार दिसत आहे. पाण्यामुळे जशी प्रगती झाली तसा या राष्ट्रीय महामार्गामुळे या भागाचा विकास होईल, असा आशावाद नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.