सांगलीतील व्यक्तीचा पॅन कार्ड क्रमांक वापरून दिल्लीत १८ कोटींची उलाढाल, ३.५० कोटींची जीएसटी चुकवेगिरी
By संतोष भिसे | Published: March 13, 2023 07:03 PM2023-03-13T19:03:36+5:302023-03-13T19:04:09+5:30
प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली, अन् संबंधित व्यकी चक्रावून गेली
सांगली : सांगलीतील व्यक्तीचा पॅन क्रमांक वापरून दिल्लीतील ठगांनी १८ कोटी रुपयांची उलाढाल केल्याचे उघडकीस आले आहे. त्यातून सुमारे ३ कोटी ५० लाख रुपयांची जीएसटी चुकवेगिरी केल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्राप्तीकर विभागाची नोटीस हातात पडल्यानंतर हे गुन्हेगारी कृत्य सांगलीतील नागरिकाच्या लक्षात आले.
जीएसटी चुकवेगिरीसाठी गुन्हेगारांकडून सातत्याने नवनवे फंडे वापरले जात आहेत. ते शोधण्यासाठी जीएसटी विभागही डोळ्यांत तेल घालून काम करत आहे. बोगस पॅन कार्डद्वारे फसवेगिरीचे प्रमाण मोठे असल्याचे विभागाला आढळून आले आहे. गेल्या आठवड्यात सांगलीतील एका नागरिकाच्या घरी प्राप्तीकर विभागाकडून कर भरण्यासंदर्भात नोटीस येऊन थडकली. त्यात त्याने दिल्ली येथे सप्टेंबर ते डिसेंबर २०२२ या तीन महिन्यांत सुमारे १८ कोटी रुपयांचा व्यवसाय केला असल्याचे नमूद केले होते. नोटीस पाहून ही व्यकी चक्रावून गेली.
आपण आयुष्यात कधीही दिल्लीला गेलो नसल्याचे तसेच तेथे कोणताही व्यवसाय केला नसल्याचे त्याचे म्हणणे आहे. त्याने अधिक चौकशी केली असता दिल्लीमध्ये त्याचा पॅन क्रमांक वापरून घोटाळेबाजाने १८ कोटी रुपयांचा व्यवसाय दाखवल्याचे स्पष्ट झाले.
विजयनगर, जतच्या रहिवाशांचीही फसवणूक
जिल्ह्यात यापूर्वी विजयनगर (सांगली) येथील एका रहिवाशाचा पॅन क्रमांक वापरून गुजरातमधील व्यापाऱ्याने कोट्यवधी रुपयांची खोबरे विक्री दाखवली होती. त्यातून चार कोटी रुपयांचा जीएसटी चुकवला होता. दुसऱ्या एका प्रकरणात जतमधील एका शेतमजुराच्या आधार, पॅन कार्डचा वापर करून कोट्यवधींची बोगस विक्री दाखवण्यात आली होती. या दोघांना जीएसटी विभागाकडून नोटिसा आल्यानंतर फसवेगिरी उघडकीस आली. पॅन व आधार कार्डविषयी बेफिकिरी दाखवल्याने त्यांना नाहक कायदेशीर प्रक्रियेत अडकावे लागले.
तुमच्या नावे जीएसटी अकाउंट...?
प्रत्येक पॅन कार्डधारकाने आपल्या पॅन व आधार क्रमांकाचा गैरवापर होत नाही ना? याविषयी सतर्क राहायला हवे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. प्रत्येक एक-दोन महिन्यांनी तपासणी केली पाहिजे. यासाठी gst.gov.in या संकेतस्थळावर टॅक्स पेयर सर्चमध्ये पॅन क्रमांक टाकला असता त्यास संलग्न जीएसटी क्रमांक समजतो. आपला कोणताही जीएसटी नोंदणी क्रमांक अस्तित्वात नसताना संकेतस्थळावर तो दिसत असल्यास फसवणूक सुरू असल्याचे समजावे. त्याविरोधात जीएसटीच्या फ्रॉड्स विभागाकडे तक्रार नोंदवावी. त्यासाठी cbic-gst.gov.in येथे तक्रार करता येते.