सांगलीत १८ तास गव्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 02:27 PM2021-12-30T14:27:46+5:302021-12-30T14:28:06+5:30

सांगली : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचे प्रयत्न अखेर १८ तासांनंतर यशस्वी ठरले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास ...

18 hours Gaur rescue operation in Sangli | सांगलीत १८ तास गव्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

सांगलीत १८ तास गव्याच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरार

Next

सांगली : मंगळवारी पहाटे सांगली शहरात घुसलेल्या गव्याला पकडण्याचे प्रयत्न अखेर १८ तासांनंतर यशस्वी ठरले. बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास तो वनविभागाच्या कंटेनरसारख्या वाहनात बंदिस्त झाला. सकाळी नऊच्या सुमारास त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. त्यामुळे सांगलीकरांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.

गेल्या तीन दिवसांपासून कसबे डिग्रज, सांगलीवाडी परिसरात गव्याचा वावर होता. मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्याने सांगली शहरात प्रवेश केला. शहरातील मध्यवर्ती भागातील मार्केट यार्डात तो शिरला. प्रशासनाने लगेच हा परिसर पूर्ण बंद करून त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मार्केट यार्डातील एका गोदामाजवळचे तीन मार्ग बंद करून बोळाच्या तोंडावर खास मागविण्यात आलेला कंटेनर उभा करण्यात आला. तो इतर मार्गाने बाहेर पडणार नाही यासाठी तिन्ही मार्ग वाहने, पत्रे लावून बंद करण्यात आले होते.

वनविभागाने कोल्हापूर व पुण्याहूनही पथक बोलावले. तीन दिवसांपासून फिरत असल्याने थकलेल्या गव्याला पाच ते सहा तास विश्रांती देण्यात आली. दुपारी तीननंतर पुन्हा त्यास वाहनात बंदिस्त करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली. त्यासाठी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून मागविण्यात आलेल्या वाहनाचे रॅम्प जममिनीच्या पातळीवर लावण्यासह इतर तयारी करण्यास प्रशासनाला रात्रीचे नऊ वाजले.

रात्री दहाच्या सुमारास पुन्हा दोन वाहने आत बोळात गेली. त्याला पुढे-पुढे आणत कंटेनरकडे आणण्याचा प्रयत्न झाले. मात्र, थकलेला गवा कंटेनरसमोरच बसत होता. त्यामुळे पुन्हा मोहीम थांबविण्यात आली. रात्री पाऊणच्या सुमारास पुन्हा वाहनांव्दारे त्यास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आले. अखेर पावणे दोनच्या सुमारास तो कंटेनरमध्ये स्वत:हून चढला. रात्री तीन वाजता पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्यास कोणतीही इजा झाली नसल्याचे दिसून आल्यानंतर कंटेनरमधून नेऊन नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

तीस तासांचा थरारक प्रवास

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता गव्याला सुरक्षितपणे अधिवासात सोडण्यात आले. यामुळे मंगळवारी पहाटे पाच ते बुधवारी सकाळी साडेनऊ असा तीस तासांचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. वन विभागाचे उपवनसंरक्षक विजय माने, सहायक वनसंरक्षक डॉ. अजित साजणे, अजितकुमार पाटील, अजित ऊर्फ पापा पाटील यांच्यासह पोलीस, महसूल, अग्निशमन दलांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रयत्न केले.

घटनाक्रम

  • मंगळवारी पहाटे ५ वाजता - गणपतीपेठमार्गे शहरात प्रवेश
  • सकाळी ७.३० - पटेल चौक, स्टेशन रोडमार्गे मार्केट यार्डात शिरकाव. तेथे बंदिस्त करण्यात यश
  • सकाळी ९.३० - पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून गव्याची पाहणी
  • सकाळी ११ - मार्केट यार्ड परिसरात जमावबंदी आदेश लागू
  • दुपारी २.१५ - कोल्हापूर, पुण्याची रेस्क्यू टीम दाखल
  • दुपारी ३ - अधिकाऱ्यांकडून परिस्थितीचा आढावा
  • दुपारी ४- वाहनांव्दारे पुढे आणण्याचा प्रयत्न
  • रात्री ९ - रेस्क्यू ऑपरेशन पुन्हा सुरू
  • रात्री १० - ऑपरेशन पुन्हा थांबवले
  • रात्री १२.४५ - पुन्हा मोहीम सुरू
  • रात्री १-३० - गवा कंटेनरमध्ये शिरला
  • रात्री ३ - गव्याची वैद्यकीय पथकाकडून तपासणी
  • रात्री ३.३० वाजता गवा घेऊन कंटेनर रवाना
  • बुधवारी सकाळी ९.३० वाजता- गव्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश

Web Title: 18 hours Gaur rescue operation in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sangliसांगली