आंतरराज्यीय सराईत घरफोड्याकडून १८ लाखांचा ऐवज जप्त
By शरद जाधव | Published: October 5, 2023 07:42 PM2023-10-05T19:42:54+5:302023-10-05T19:43:16+5:30
एलसीबीची कारवाई; सांगलीसह कोल्हापूर, दापोलीतील गुन्हे उघडकीस
सांगली: जिल्ह्यातील तासगाव, इस्लामपूर, आष्टासह कोल्हापूर आणि दापोली (जि. रत्नागिरी) येथे घरे फोडून ऐवज लंपास करणाऱ्या अट्टल चोरट्यास पोलिसांनी जेरबंद केले. लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने (वय ३०, रा. अनिलनगर, पंढरपूर जि. सोलापूर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याकडून तब्बल १७ लाख ९२ हजार ७३८ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी जिल्ह्यातील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एलसीबीचे पथक सांगली शहरात गस्तीवर होते. यावेळी पथकाला माहिती मिळाली की, संशयित माने हा शहरात संशयास्पदरित्या फिरत आहे. त्यानुसार पथकाने कुपवाड येथे छापा मारून त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने सांगलीसह कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीच्यावेळी बंद घरे फोडून चोरी केल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याचा रिमांड घेतला असता, आणखी गुन्हे उघडकीस आले.
एलसीबीचे निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक पंकज पवार, सिकंदर वर्धन, कुमार पाटील, अच्युत सुर्यवंशी, सागर लवटे, विक्रम खोत, अमर नरळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
हे गुन्हे उघडकीस
तासगाव येथील मिनल अविनाश कुडाळकर यांचे घर फोडून माने याने सहा लाख ९६ हजारांचा माल लंपास केला होता. आष्टा येथील सुभाष शंकर कुलकर्णी यांचे घर फोडून ६३ हजारांचा ऐवज, पेठनाका येथील दीपक माणीक जाधव यांच्या घरातून दोन लाख ७० हजार रुपयांचा ऐवज तर शायरा शाबुद्दीन मुजावर (रा. न्यू शाहूपुरी, कोल्हापूर) यांच्या घरातून १ लाख २५ हजार रुपये आणि दापोली (जि. रत्नागिरी) येथील शेखर गजानन प्रधान यांचे घर फोडून १ लाख ५६ हजारांचा ऐवज लंपास केला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला.