व्यापाऱ्यास १८ लाखांचा गंडा
By Admin | Published: October 14, 2014 10:39 PM2014-10-14T22:39:18+5:302014-10-14T23:21:17+5:30
सांगलीतील घटना : सोने आटणी कामगाराचे पलायन; गुन्हा दाखल
सांगली : येथील सराफ कट्ट्यावरील सोने आटणी व्यापारी दत्तात्रय हरिनाम बाबर (रा. दत्त-मारुती रस्ता, सांगली) यांना एका कामगाराने १७ लाख ४५ हजारांचा गंडा घालून पलायन केल्याची घटना आज (मंगळवार) उघडकीस आली. दीपक पांडुरंग बाबर (रा. चोपडी, ता. सांगोला, जि. सोलापूर) असे या कामगाराचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दत्तात्रय बाबर यांचा सराफ कट्ट्यावर सोने आटणीचा व्यवसाय आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्याकडे दीपक बाबर हा कामगार कामास होता. तो सांगलीतच भाड्याने खोली घेऊन राहत होता. तो आठवड्यातून एकदा गावी जात असे. दत्तात्रय बाबर दुकानातून कामानिमित्त बाहेर गेल्यानंतर, दीपक सोने आटणी करताना त्यातील एक-दोन ग्रॅम सोने काढून घ्यायचा. गेल्या दोन महिन्यांपासून त्याने आटणी करताना सोने चोरण्याचा हा उद्योग सुरू केला होता. सोने आटणी किती केले, याची नोंद ठेवण्यासाठी दत्तात्रय बाबर यांनी रजिस्टर घातले होते. मात्र दीपक रजिस्टरमध्ये अनेकदा नोंदी करीत नसे. दत्तात्रय बाबर दररोज रजिस्टर तपासत नव्हते. त्यामुळे हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.
आठवड्यापूर्वी त्यांना आटणीला आलेल्या सोन्यातील सोने गायब होत असल्याचे लक्षात आले. त्यांना दीपकवर संशय आला. त्यांनी यासंदर्भात दीपककडे विचारणा केली. त्यावेळी त्याने सोने चोरीची कबुली दिली. आटणीसाठी आलेल्या सोन्यातील तब्बल १७ लाख ४५ हजारांच्या सोन्यावर त्याने डल्ला मारल्याचे रजिस्टर तपासणीवरून दिसून आले. हे सोने त्याला तातडीने परत करण्यास सांगितले होते. मात्र तो गायब झाला.
दत्तात्रय बाबर यांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याचा सुगावा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना कोणतीच माहिती मिळाली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच दत्तात्रय बाबर यांनी शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होणार असल्याने पोलीस बंदोबस्तात आहेत. बंदोबस्तानंतर त्याच्या पुढील शोधासाठी ते सांगोल्याला जाणार आहेत. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
पोलीस सांगोल्याला जाणार
दत्तात्रय बाबर यांचे गावही चोपडी आहे. तेथे दीपक त्यांच्याशेजारीच राहतो. त्याला कामाची गरज होती. यासाठी दत्तात्रय बाबर यांनी त्याला कामावर ठेवले होते. तो शेजारचा व नात्यातील असल्याने त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला होता. परंतु त्याने मात्र त्यांचा विश्वासघात केला. उद्या (बुधवार) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असल्याने पोलीस बंदोबस्तात आहेत. बंदोबस्तानंतर त्याच्या पुढील शोधासाठी ते सांगोल्याला जाणार आहेत.