खुनातील १८९ कैदी सांगली कारागृहात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2016 11:34 PM2016-06-27T23:34:12+5:302016-06-28T00:47:59+5:30
खटले न्यायप्रविष्ट : गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण वाढले; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
सचिन लाड --सांगली जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ‘खून का बदला खून’ या रागातून अनेकांचे मुडदे पाडण्यात आले. अनैतिक संबंध, जमिनीचा वाद, पूर्ववैमनस्य, प्रेमप्रकरण व किरकोळ कारणातून हे खून झाले. या खुनांतील तब्बल १८९ कैदी सांगली कारागृहात न्यायालयीन निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये १८४ पुरुष व पाच महिलांचा समावेश आहे. कैद्यांच्या वाढत्या संख्येमुळे कारागृहाने क्षमता ओलांडली आहे. त्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना पोलिस व कारागृह प्रशासनास तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सांगलीचे कारागृह २३५ कैद्यांच्या क्षमतेचे आहे. यामध्ये २०५ पुरुष व ३० महिलांना ठेवता येते. पण गेल्या काही वर्षात जिल्ह्यातील गुन्हेगारीत वाढच होत राहिल्याने कारागृहात कैद्यांची संख्या वाढत गेली. खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, दरोडा, खंडणी अशा गंभीर गुन्ह्यांतील कैदी येथे आहेत. विशेषत: खुनाच्या गुन्ह्यांतील कैद्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कैद्यांची संख्या वाढत असताना, त्या तुलनेत अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे कैद्यांच्या सुरक्षेचा भार पेलताना डोळ्यात तेल घालून त्यांना काम करावे लागत आहे. रविवारअखेर तब्बल ३९० कैदी होते. गेल्या चार-पाच वर्षात पहिल्यांदाच कैद्यांची संख्या एवढी झाली आहे. दोन-चार कैदी जामिनावर बाहेर पडत असले तरी, तेवढेच नव्याने आत येतात. त्यामुळे कैद्यांच्या या संख्येत नेहमीच चढ-उतार होत राहिला आहे.
खुनातील १८९ कैदी आहेत. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. त्यांच्याविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. काहींनी जामिनासाठी अर्ज केला होता. पण त्यांना जामीन मिळाला नाही. पंधरवड्यातून एकदा त्यांना न्यायालयात उभे केले जाते. खटले न्यायप्रविष्ट असले तरी, निकाल कधी लागतो, याची त्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. संजयनगरमधील मनोज कदम याचा खून केल्याप्रकरणी गुंड म्हमद्या नदाफसह २४ जणांना अटक करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव या सर्व संशयितांना कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवले आहे. ते येथे असते तर खुनांतील कैद्यांची संख्या दोनशेवर गेली असती. तसेच जिल्हा परिषदेच्या पेपर फुटीतील २४ संशयितांना जामीन मिळाला आहे. तेही सर्वजण येथे असते, तर कैद्यांची संख्या साडेचारशेपर्यंत गेली असती.
मे महिन्यात १६ खून
जिल्ह्यात मे महिन्यात तब्बल १६ खून झाले. या खुनातून ५० ते ५५ नवीन संशयित रेकॉर्डवर आले. तेही सध्या कारागृहात आहेत. खुनातील कैद्यांची संख्या वाढण्यास हे कारणही आहे. गुन्ह्यांचे वाढते प्रमाण पाहिले, तर कैद्यांना ठेवण्यासाठी सांगलीचे कारागृह अपुरे पडू लागले आहे. त्यामुळे कारागृह कवलापूर (ता. मिरज) येथील नियोजित विमानतळावर हलविण्याचा निर्णय योग्य आहे. तत्कालीन कारागृह अधीक्षकांनी या जागेसाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर तो शासनाकडे गेला आहे.